पक्षपातीपणा केला असता तर १५ कोटी मिळाले असते का..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:56+5:302021-08-21T04:27:56+5:30
कोल्हापूर : निधी वाटपात पक्षपातीपणा केला असता तर काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना डावलून १५ कोटी रुपये दिले असते का, असा ...

पक्षपातीपणा केला असता तर १५ कोटी मिळाले असते का..?
कोल्हापूर : निधी वाटपात पक्षपातीपणा केला असता तर काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना डावलून १५ कोटी रुपये दिले असते का, असा प्रतिसवाल पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना उद्देशून केला. जिल्ह्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादीने कमीपणा घेऊन शिवसेनेला झुकते माप दिले आहे, तरीदेखील अन्याय झाल्याचे वाटत असल्यास थेट माझ्याकडे लेखी द्यावे, त्याची दखल घेऊ, अशीही ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
शुक्रवारी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्काराच्या घोषणेसाठी पत्रकार बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी गुरुवारी माजी मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी राज्यात सत्ता असून जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला निधी मिळत नाही, पक्षपातीपणा केला जातो, असा आरोप केला होता. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पाटील यांनी स्पष्टीकरण केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार आहेत, पण त्यांना डावलून आम्ही क्षीरसागर यांना १५ कोटींचा निधी दिला. यावरून तरी त्यांनी पक्षपातीपणाचा आरोप करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने माझ्याकडे याबाबतीत वैयक्तिक तक्रार केलेली नाही, पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जिल्ह्यातील सत्ताकेंद्राच्या पदांची वाटणी पाहिली तर शिवसेनेकडे जास्त मंत्रिपदे आहेत. शिरोळचे शिवसेनेचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर मंत्री आहेत. राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे कृषी महामंडळाचे उपाध्यक्षपद आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह वडगाव बाजार समितीतही शिवसेनेला सोबत घेतले आहे. संजय गांधी निराधार याेजना समित्यांवर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. जिल्हा नियोजन मंडळात त्यांची दोन नावे निश्चित आहेत. ही सर्व पदे पाहिली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे केवळ दोन मंत्रिपदे आहेत. खरे तर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून आम्ही तक्रारी करायला हव्या होत्या, पण आम्हाला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चालवायचे असल्याने काहीही आम्ही आक्षेप घेत नाही.
चौकट
एकत्र राहूया....
महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे, छोट्या-मोठ्या तक्रारी असल्या तरी त्या स्पष्टपणे एकमेकांशी मांडूया, मनात कोणताही क्लेश ठेवायला नको. सरकार म्हणून एक राहून जिल्ह्याचा विकास करूया, अशी आमची दोन्ही काँग्रेसची भावना असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
चौकट
मुरलीधर जाधव नियुक्तीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ‘
‘गोकुळ’मध्ये शासन नियुक्त सदस्य म्हणून मुरलीधर जाधव यांना घेण्याबाबतचा मुद्दा तांत्रिक आहे. तो मुख्यमंत्रीच सोडवणार आहेत. याबाबतीत मी व मंत्री हसन मुश्रीफ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.