कुरुंदवाडमध्ये सव्वा लाखाचा गुटखा जप्त
By Admin | Updated: July 1, 2015 00:14 IST2015-07-01T00:14:26+5:302015-07-01T00:14:26+5:30
संशयितास अटक : अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

कुरुंदवाडमध्ये सव्वा लाखाचा गुटखा जप्त
कुरुंदवाड : येथील दत्तनगरमधील गुटखा साठा केलेल्या घरावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून १ लाख ३६ हजारांचा माल जप्त केला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही कारवाई झाली असून, साठा करणारे बी. ए. मगदूम (वय ३३, रा. सन्मित्र चौक, कुरुंदवाड) या संशयितास ताब्यात घेऊन अटक केली आहे.
गुटखा विक्रीला बंदी असल्याने पानपट्टी खोकीमधून चोरट्या पद्धतीने जादा किंमत घेऊन गुटखा विकला जात आहे. मजरेवाडी हद्दीतील दत्तनगरमधील गंगाराम रामचंद्र परीट यांच्या पत्र्याचे शेड असलेल्या घरात संशयित आरोपी बी. ए. मगदूम साठा करून गुटखा विक्री करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना समजली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी बिभिषण मुळे, सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले, संपत देशमुख यांच्या मंगळवारी, सकाळी साडेदहाच्या सुमारास धाड टाकली. यावेळी घरामध्ये २२ प्रकारचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. सर्व माल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १ लाख ३६ हजार ७२६ रुपये होते. तसेच प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून विक्री
करणारा बी. ए. मगदूम याला अटक करून अधिक तपासासाठी
कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करीत आहेत.
गुटखा बंदी असतानाही पानपट्टी खोक्यामधून चोरट्या पद्धतीने अव्वाच्या सव्वा किमतीने गुटखा विक्री केली जात आहे. (वार्ताहर)