कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST2021-09-27T04:24:35+5:302021-09-27T04:24:35+5:30
* अन्न, औषध प्रशासनाकडून ठोस कारवाईची गरज मिलिंद देशपांडे दत्तवाड : येथील दुधगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून गुटख्याची तस्करी ...

कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरूच
* अन्न, औषध प्रशासनाकडून ठोस कारवाईची गरज
मिलिंद देशपांडे
दत्तवाड : येथील दुधगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून गुटख्याची तस्करी राजरोसपणे सुरू आहे. कुरुंदवाड पोलिसांचे हात ओले होत असल्यामुळे याकडे दुर्लक्ष करत आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. तर अन्न आणि औषध प्रशासनाने यावर ठोस कारवाई करून या तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र शासनाने औषध व प्रशासन विभागाच्या प्रतिबंधित गुटख्यावर पूर्णत: बंदी घातली आहे. यासाठी युवकांचे आरोग्य महत्त्वाचे हा विषय न्यायालयीन पातळीवर गेला तरी शासनाने आपली बाजू खंबीरपणे मांडून राज्यात पूर्णपणे गुटखाबंदी केली आहे. मात्र, शेजारी असणाऱ्या कर्नाटकात गुटखाबंदी नसल्याने तेथून महाराष्ट्रात गुटखा आणून विकल्या जाणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.
दत्तवाड-बिरनाळ येथील रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावरील दुधगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर वाहतूक सुरू असून तेथून राजरोसपणे गुटखा महाराष्ट्रात आणला जात आहे. याकडे कुरुंदवाड पोलीस व दत्तवाड आऊटपोस्ट पोलीस स्टेशन दुर्लक्ष करत असून यात काही आर्थिक लागेबांधे आहेत का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. या रस्त्यावर काही तस्करांवर यापूर्वी कारवाई झाली आहे; पण अनेक जण पोलिसांचे हात ओले करून यातून सुटत आहेत. अन्न व प्रशासन विभागाने याबाबत ठोस कारवाई करून ज्या उदात्त हेतूने महाराष्ट्रात शासनाने गुटखा बंद केला तो हेतू साध्य होण्यासाठी कारवाई करून गुटखा बंदी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
______________
पोलिसांकडून जुजबी कारवाई
एखाद्या गुटखा तस्करला पकडले तर त्याला दत्तवाड-कुरुंदवाड रस्त्यावर घेऊन जाऊन गुटखा प्रतिबंध कायदा किती कडक आहे, कशी शिक्षा होते, याबद्दल भीती दाखवून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद न घेता परस्पर मिटवले जाते. परत असे करू नये, असा गोड सल्ला देऊन जप्त केलेला गुटखाही परत दिला जातो. तो गुटखा तस्कर शिक्षा होत नाही व कारवाई होत नाही या समजुतीने परत त्याच मार्गाने जात आहे.