जुन्या देवल क्लबच्या जागेवर गुरुकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:34+5:302021-02-11T04:26:34+5:30
कोल्हापूर : जुन्या देवल क्लबच्या जागेवर गुरुकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी बुधवारी ...

जुन्या देवल क्लबच्या जागेवर गुरुकुल
कोल्हापूर : जुन्या देवल क्लबच्या जागेवर गुरुकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी बुधवारी येथे दिली. ‘लोकमत’मध्ये बुधवारी या इमारतीची पडझड झाल्याचे छायावृत्त प्रसिध्द झाले होते, त्याअनुषंगाने ते बोलत होते.
गेली बारा वर्षे देवल क्लबच्या विकासाचे काम सुरू आहे. यासाठी अनेकांनी सहकार्य केले. त्यामुळे एक सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे. याच धर्तीवर आता जुन्या देवल क्लबच्या जागेचा विकास करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले, नव्या देवल क्लबमधील सभागृहाचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण लक्ष दिले. संगीतकार्यासाठी आता दहा खोल्या तयार झाल्या आहेत. गेल्यावर्षीच या इमारतीच्या ठिकाणी नवी इमारत बांधण्याचे नियोजन केले होते. मात्र कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणी आल्या. त्यामुळे हे काम थांबले. इथला नियोजित आराखडाही तयार करून तो मंजूर करून घेण्यात आला आहे. या ठिकाणी संगीत क्षेत्रातील येणाऱ्या मान्यवरांची निवासव्यवस्था आणि छोटे परिसंवाद, कार्यक्रम व्हावेत यासाठीची सुविधा उभारण्यात येणार आहे. सध्या जुन्या इमारतीला उंदीर, घुशी लागल्या असल्याने आणि ती इमारत पाडून नवी इमारत बांधायची असल्याने त्यावर दुरुस्तीसाठी खर्च केलेला नाही.