मल्लविद्येचे गुरुकुल ‘मोतीबाग तालीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:45 AM2019-10-14T00:45:33+5:302019-10-14T00:45:38+5:30

सचिन भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : घुमणारा शड्डूंचा आवाज, ईर्षा, जिद्द, दिवसातील आठ तास अंगमेहनत आणि एकच ...

Gurukul of Moral Vidya 'Motibagh Training' | मल्लविद्येचे गुरुकुल ‘मोतीबाग तालीम’

मल्लविद्येचे गुरुकुल ‘मोतीबाग तालीम’

googlenewsNext

सचिन भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घुमणारा शड्डूंचा आवाज, ईर्षा, जिद्द, दिवसातील आठ तास अंगमेहनत आणि एकच ध्येय - प्रतिस्पर्धी मल्लाला अस्मान दाखवायचं. यातून कोणाला महाराष्ट्र केसरी, तर कोणाला रुस्तम-ए-हिंद, तर कोणाला आॅलिम्पिक- मध्ये खेळायचे स्वप्न... अशा एक ना अनेक मल्लांना घडविणारी शाळा म्हणून संपूर्ण भारतात १८२५ पासून अखंडपणे आजही कुस्तीचे धडे देणारी मोतीबाग तालीम जोमाने, नव्या दमाचे मल्ल घडविण्यात मग्न आहे. केवळ इमारती अन् माणसे बदलत आहेत. तरीसुद्धा ही तालीम २०० वर्षांकडे वाटचाल करीत आहे. या तालमीला २०२५ साली २०० वर्षे पूर्ण होत आहेत.
ऊन, पाऊस, वारा अंगावर आजही झेलत भवानी मंडपाच्या आतील गुरुमहाराज वाड्यालगत मोतीबाग तालीम तितक्याच जोमाने उभी आहे. या तालमीची स्थापना छत्रपती बापूसाहेब महाराजांनी १८२४ ते १८२५ च्या दरम्यान केल्याचे सांगितले जाते. या तालमीत खुद्द राजर्षी शाहू महाराजांनीही कुस्तीचे धडे गिरविले आहेत. पुढे राजर्षी शाहू महाराजांचे निकटवर्तीय असलेल्या गुरुमहाराज यांच्या अधिपत्याखाली १९०० च्या पुढील काळात या तालमीची वाटचाल राहिली. या काळात ‘अखंड भारत’ होता. त्यामुळे त्यावेळच्या लाहोर (आता पाकिस्तानात)सह हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील सधन, गरीब घरांतील युवक कोल्हापूरच्या तालमींमध्ये केवळ कुस्तीकरिता येत होते. विशेष म्हणजे मोतीबाग तालमीकडे या युवकांचा अधिक ओढा होता. आपला मुलगा कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत गेला आहे म्हटल्यावर अनेक पालकांना पाल्याची चिंताच नसे; कारण येथील वस्ताद त्या मल्लांकडून एकावेळी अडीच हजार जोर-बैठका, त्याशिवाय अंगाचे पाणी करणारे विविध डाव शिकवीत आणि करूनही घेत. हौदा उकरणे म्हणजेच आखाड्यातील माती खोदणे, प्रचंड अंगमेहनतीचे काम करून घेत. ही परंपरा आजही सुरू आहे.
अशाच शतकोत्तर मोतीबाग तालमीमधील ‘सुल्तान’ होण्यासाठी आलेल्या नवोदितांचा दिनक्रम, व्यायाम, आहार, राहण्याची व्यवस्था, जेवण करून खाण्याची पद्धत आजही सुरूच आहे. १८ वर्षांवरील एका मल्लास महिन्याकाठी ३० हजार रुपये इतका खर्च, तर १० ते १८ वर्षांपर्यंतच्या मल्लास किमान २० ते २५ हजार इतका खर्च येतो.

तालमीत घडलेले मल्ल असे
गुलाम पैलवान, रहिमानी, कल्लू पैलवान, हमिदा पंजाबी, कल्लू गामा, अलम चुआ, जिझा पैलवान, छोटा हमिदा, सरदार गामा, बाबू बिरी, देवाप्पा हळीगळे, जिन्नापा अकिवाटे, रामचंद्र शिंदे, आॅलिम्पिकवीर के. डी. माणगावे (प्रथम सुबराव गवळी तालीम, नंतर मोतीबाग), हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी चंबा मुत्नाळ, महान भारत केसरी दादू चौगुले, बांगडीबहाद्दर पी. जी. पाटील, कुस्तीसम्राट युवराज पाटील, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतारे, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, जागतिक शालेय कुस्तीत विजेतेपद पटकाविलेले संभाजी पाटील-कोपार्डेकर, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, तर शालेय आंतरराष्ट्रीय विजेते विक्रम कुराडे, अक्षय डेळेकर.

विस्तीर्ण परिसर : हेरिटेज वास्तू असलेल्या मोतीबाग तालमीचा परिसर १४ हजार चौरस फुटांचा आहे. यात मुख्य कुस्तीचा आखाडा, शेजारी गुरुकुल पद्धतीच्या खास पैलवानांना राहण्यासाठीच्या खोल्या, वरील मजल्यावर मॅट हॉल, ऐतिहासिक मारुती मंदिर आहे. १९५० नंतर या तालमीची मालकी संस्थानातून कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडे आली. तालमीवर मुख्य विश्वस्त बाळासाहेब गायकवाड, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, महासचिव अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, महान भारत केसरी दादू चौगुले यांचे आजही अखंडपणे नियंत्रण आहे. बाळासाहेब गायकवाड यांनी पै-पै करीत तालमीकरिता ५५ लाख रुपये जमविले आहेत. त्या ठेवींच्या व्याजावर येथील व्यवस्थापन सुरू आहे. १९९७-१९९८ साली राज्य शासनाने तालमीशेजारील जागेत बांधकामासाठी २५ लाखांचा निधी दिला. आजही तालीम विकासापासून वंचित राहिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक व खासदार उदयसिंग गायकवाड यांच्या विशेष प्रेमामुळे ही तालीम कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने खरेदी केली.
वस्तादांचा शब्द अंतिम
मल्ल वयाच्या दहाव्या वर्षी तालमीमध्ये वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली येतो. त्यात वस्तादांच्या केवळ पायांकडे पाहण्याची आजही परंपरा आहे. त्यामुळे वस्तादांनी आदेश सोडायचा आणि त्याप्रमाणे मल्लांनी मनात कोणताही किंतु न ठेवता सराव करायचा. मल्लाने कुस्तीचे व्रत घेतले की, त्याप्रमाणे तालमीमध्येच येऊन राहण्याची आजही परंपरा आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंतचा दिनक्रम येथेच ठरतो. एकत्रित चुलीवर, स्टोव्ह, गॅसवर जेवण करायचे आणि ते खायचे. एका बाजूला सर्वांनी रांगेने निद्रेसाठी जागा करायची आणि तेथेच कुस्तीतील शिक्षण पूर्ण करायचे, अशी कित्येक वर्षांची परंपरा मोतीबाग तालमीत आजही जोपासली जाते.
कुस्तीसाठी वर्षानुवर्षांची मेहनत
कुस्तीसम्राट युवराज पाटील हे १९७० साली मोतीबाग तालमीत कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी दाखल झाले. त्यांना ‘महाराष्ट्र केसरी’ व ‘कुस्तीसम्राट’ म्हणून गौरव प्राप्त करण्यासाठी तब्बल १४ वर्षे या तालमीत कसून सराव करावा लागला. त्यानंतरही ते मोतीबागमध्ये सराव करीत होते. मात्र, त्यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्यावर अपार मेहनत घेणारे त्यांचे गुरू बाळासाहेब गायकवाड, पी. जी. पाटील हे ‘मोतीबाग’साठी ५० वर्षांहून अधिक काळ मेहनत घेत आहेत.
वसतिगृह प्रस्तावित : आजही या तालमीत कोल्हापूरसह सातारा, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नागपूर, लातूर, आदी भागांतून अनेक पालक पाल्यांना दाखल करीत आहेत. त्यांना पूर्वीप्रमाणेच स्वत: जेवण करून खावे लागते. आजच्या काळात ही बाब कठीण होत आहे. त्यामुळे संस्था पदाधिकाऱ्यांचा मल्लांना पोषक आहार मिळावा, याकरिता आधुनिक पद्धतीचे वसतिगृह व मेस बांधण्याचा संकल्प आहे.

Web Title: Gurukul of Moral Vidya 'Motibagh Training'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.