गुरुजींच्या नववर्षाची सुरुवात शंखध्वनीन
By Admin | Updated: January 2, 2015 00:18 IST2015-01-01T23:34:52+5:302015-01-02T00:18:13+5:30
शिक्षण उपसंचालक कार्यालय : अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित देण्याची मागणीे

गुरुजींच्या नववर्षाची सुरुवात शंखध्वनीन
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खासगी प्राथमिक शाळेतील संचमान्यतेपूर्वी अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्यावतीने येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज, गुरुवारी शंखध्वनी आंदोलन करण्यात आले़ यावेळी शासन, शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री तसेच शिक्षण सचिवांच्या नावाने गुरुजनांनी शंखध्वनी केला़
यावेळी महासंघाचे शहराध्यक्ष संतोष आयरे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांना दिले़ या निवेदनात म्हटले आहे, शासनाने कोल्हापूर शहरातील खासगी प्राथमिक शाळेतील संचमान्यतेपूर्वी अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅक्टोबर २०१५ पासून रोखलेले आहे़ त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ तसेच २०१३/१४ च्या संचमान्यतेमध्ये सर्वच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविले आहे. त्यामुळे अशा शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन जानेवारी २०१५ पासून थांबणार आहे़
अतिरिक्त ठरविलेले कर्मचारी हे कायम कर्मचारी आहेत़ १९८१ च्या कायद्यातील तरतुदीनुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन दुसरीकडे होत नाही, तोपर्यंत त्यांचा पगार मूळ शाळेतून देण्याची तरतूद आहे़ असे असूनही शासनाने गेल्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून त्यांच्यावर अन्याय केला आहे़
या आंदोलनात एम़ डी़ पाटील, राजेंद्र कोरे, रंगराव कुसाळे, राजाराम संकपाळ, शीतल नलवडे, सुधीर पोवार, यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)