गुरुजी करणार अध्यक्षाला सलाम
By Admin | Updated: November 9, 2014 01:06 IST2014-11-09T01:06:19+5:302014-11-09T01:06:54+5:30
मुख्यालयात राहण्याच्या आदेशाची कार्यवाही

गुरुजी करणार अध्यक्षाला सलाम
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयात राहण्याच्या आदेशाची कार्यवाही तालुका पातळीवर सुरू झाली आहे. यामुळे मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. शिक्षक खरोखरच मुख्यालयात राहतात की नाहीत, याची माहिती विहित नमुन्यात संकलित केली जात आहे. मुख्यालयात राहत असलेल्या विहित नमुन्यातील तपासणी अहवालावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किंवा सचिव यांची सही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गुरुजींना आता सहीसाठी अध्यक्ष किंवा सचिव यांना सलाम ठोकावा लागणार आहे.
मुख्यालयात राहत असलेल्या तपासणी अहवालातील माहितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कागदोपत्री मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी घर शोधून राहावे लागणार आहे. जिल्ह्णातील सर्वच शिक्षक मुख्यालयात राहतात, या माहितीची फेरतपासणी केली जात आहे. शिक्षकाचे नाव, कार्यरत असलेल्या शाळेचे नाव, शिक्षकाचे सध्याचे राहण्याचे ठिकाण, घरमालकाचे नाव, घर नंबरसह पूर्ण पत्ता, शिक्षक घरी नेहमी वास्तव्यास असल्याबाबत घरमालकाची स्वाक्षरी, शिक्षकांचे मूळ गाव, तपासणीअंती मुख्यालयात राहतात अगर कसे, नसल्यास मुख्यालयात न राहण्याची कारणे, मुख्यालयाच्या ठिकाणी राहत असलेल्या घरासमोर थांबून संबंधित शिक्षकांनी काढून घेतलेला फोटो, भाड्याने राहत असल्यास घरमालकाचा करारनामा किंवा संमतीपत्र अशी माहिती शिक्षकांना द्यावी लागणार आहे. ही माहिती खरी आणि वस्तुस्थितिजन्य असल्याची खात्री करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यावर आहे. मुख्यालयात राहत असल्याबद्दल खोटी माहिती दिलेल्यांचा शोध घेण्यासाठी या नमुन्यात माहिती घेतली जात आहे. मुख्यालयात राहत असल्याचे कागदोपत्री दाखवून घरभाडे घ्यायचे आणि प्रत्यक्षात आपल्याला हव्या त्या ठिकाणी राहायचे, असे सध्याचे वास्तव आहे. केवळ शिक्षकच नव्हे, तर सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांची मुख्यालयात राहण्याची मानसिकता नाही.