दरातील घसरणीने गुऱ्हाळघरांना ग्रहण

By Admin | Updated: November 20, 2015 00:03 IST2015-11-20T00:02:29+5:302015-11-20T00:03:49+5:30

साखर कारखान्यांनी दराबाबत संदिग्धता ठेवल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याचे मत

Gurhalghar eclipsed due to downfall | दरातील घसरणीने गुऱ्हाळघरांना ग्रहण

दरातील घसरणीने गुऱ्हाळघरांना ग्रहण

प्रकाश पाटील, कोपार्डे : जिल्ह्यात सर्वसाधारण दसरा दिवाळीला जोमात सुरू होणारी गुऱ्हाळघरे गुळाच्या दरातील घसरणीने मंदावली आहेत. गुळाला प्रतिक्विंटल २१०० ते २६०० रुपये दर मिळत असल्याने तोट्याचा व्यवहार करण्यास शेतकऱ्यांचीही मानसिकता नाही. यामुळे जिल्ह्यातील १२०० गुऱ्हाळघरांपैकी केवळ १५० गुऱ्हाळघरांच्या चिमण्या पेटल्या आहेत.
सध्या गुऱ्हाळघरांसमोर गूळ दर घसरण, औषध व अन्न विभागाचा परवाना व मजुरांची समस्या यासह अनेक गोष्टींच्या अडचणी आहेत. यातून मार्ग काढत गुऱ्हाळघर मालक आपले गुऱ्हाळघर सुरू करताना दिसत आहेत. मात्र, यावर्षी हंगाम सुरुवातीपासून गुळाच्या दरामध्ये मंदीचे निर्माण झालेले सावट आजही कमी झालेले नाही. सर्वसाधारण गुळाला २१०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरांना पाठविण्यासाठी तयार नाहीत. याचा परिणाम गुऱ्हाळघरांच्या कार्यक्षमतेवर झाला आहे.
सध्या कर्नाटकात व सीमाभागात तयार होणारा गूळ कोल्हापूर समितीत येत असल्याने गुळाच्या आवकेत वाढ दिसत आहे. मागील वर्षी १४ नोव्हेंबर २०१४ पर्यंत बाजार समितीत ३० किलोप्रमाणे एकूण रव्यांची आवक पाहिली तर ती २ लाख २१ हजार ७३४ होती. यावर्षी यामध्ये वाढ होऊन १४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत एकूण रव्यांची आवक २ लाख ५० हजार ९१७ इतकी झाली आहे. ही आकडेवारी पाहता २९ हजार १८३ रव्यांची जादा आवक बाजार समितीत दिसून येते. मात्र, यात कर्नाटकी गुळाचा समावेश असल्याने ही वाढ दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम कोल्हापुरातील गुऱ्हाळघरांवर होताना दिसत असून, आता कोल्हापुरी गुळाला कर्नाटकातील गुळाशी स्पर्धा करावी लागणार आहे.
कोल्हापुरी गुळाला जी आय मानांकन मिळाले असले तरी त्या मानांकनात नमूद करण्यात आलेल्या तांत्रिक अटी व शर्तीनुसार गूळच तयार केला जात नसल्याचे सांगण्यात येते. याचा परिणाम हे मानांकन टिकविण्यासाठी आता शासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सर्वसाधारण अडीच क्विंटल गुळासाठी येणारा खर्च व उत्पादन याचा ताळमेळ पुढीलप्रमाणे
* ऊस किमान अडीच टन - ५,७५० (साखर कारखान्यांच्या दराप्रमाणे)
* गुऱ्हाळघर खर्च - २०००
* गुऱ्हाळघर मालकाला द्यावा
लागणारा गूळ २५ किलो - ६७५ (२५ रुपयांप्रमाणे प्रतिकिलो)
* गूळ वाहतूक - १२५ रुपये (प्रति रवा ५ रुपयांप्रमाणे)
* अडत - ३० रुपये
* हमाली - २५ रुपये
एकूण खर्च - ८६०५ रुपये
सरासरी मिळणारा गुळाला दर २५०० रुपये प्रतिक्विंटल असून, अडीच क्विंटल गुळाचे ६ हजार २५० मिळतात यातून उत्पादन खर्च वजा केल्यास २ हजार ३५५ रुपये गूळ उत्पादकला तोटाच सहन करावा लागत आहे. यामुळे ऊसउत्पादक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरांकडे पाठविण्याऐवजी साखर कारखान्यांकडे पाठविण्याकडे कल वाढला आहे.
शिवाजी पाटील (अध्यक्ष, गूळ उत्पादक संघटना, कोल्हापूर)
गुळाला मिळणारा दर चिंताजनक आहे. कोल्हापुरी गुळाला जी आय मानांकन मिळाले असले तरी ग्रामीण भागात त्या मानांकनाप्रमाणे गूळ उत्पादन करण्यास तज्ज्ञ गुळवे नाहीत. त्यातच कर्नाटकमधील गुळाची स्पर्धा निर्माण झाल्याने गुळाला दर मिळेना. किमान ३५०० ते ४५०० दर मिळाला तर गुऱ्हाळघरे चालतील, अन्यथा अवघड आहे.
विजय नायकर (सचिव, सांख्यकी विभाग, बाजार समिती, कोल्हापूर)
दसरा, दिवाळीमुळे गुऱ्हाळघरांना गती मिळालेली नाही. आता सण संपले आहेत. कोल्हापुरी गूळ हा बँ्रड टिकवायचा असे तर अन्न व औषध प्रशासनाच्या नियम व अटीप्रमाणे गूळ उत्पादन आवश्यक आहे.
शिवाजी पाटील (गूळ उत्पादक शेतकरी, शिंदेवाडी, ता. करवीर)
आमच्या गावात ऊसउत्पादक शेतकरी गुऱ्हाळघरांना प्राधान्य देत होते; पण गूळ उत्पादन व खर्च पाहता म्हैशी पेक्षा रेडकू मोठे होत आहे. यामुळे गुऱ्हाळघरांना गूळ उत्पादनासाठी ऊस मिळेना. यापेक्षा शेतकरी कारखान्यांना ऊस घालणे पसंत करीत आहेत.

Web Title: Gurhalghar eclipsed due to downfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.