तरुणींच्या हाती खुरप्यांऐवजी बंदुका
By Admin | Updated: August 25, 2014 22:13 IST2014-08-25T20:14:38+5:302014-08-25T22:13:53+5:30
कायद्याचे रक्षक : उंब्रज पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील बारा शेतकरीकन्यांची मुंबई पोलीस दलात निवड

तरुणींच्या हाती खुरप्यांऐवजी बंदुका
अजय जाधव -उंब्रज --ज्या हातात ‘खुरपे’ घेण्याशिवाय पर्यायच नव्हता, त्या हातात कायद्याचा दंडुका दिसणार नाही. उंब्रज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बारा तरुणींची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या रणरागिणी आता मुंबईकरांच्या सेवेत खाकी वर्दी घालून सज्ज होणार आहेत.ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. मुलींना नोकरी करणे याकडे अनेकदा समाजाचे नकारात्मक विधाने असतात. दहावी-बारावी झाली की लग्नाची तयारी ग्रामीण भागात सुरू असते. काहीजणी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतात; परंतु घरातील लोकांचे ‘शुभमंगल’ उरकण्यासाठी प्रयत्न सुरू असतात.हल्ली ग्रामीण भागात झपाट्याने बदल होत आहे. ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत महिला विविध क्षेत्रांत अग्रभागी कार्य करत आहेत. यातच महिला पोलीस ही संकल्पना अजूनही ग्रामीण भागात रुजलेली नाही. तरीही उंब्रज परिसरातील बारा तरुणी महिला पोलीस म्हणून भरती झाल्या आहेत. भरतीप्रक्रियेची जाहिरात सुटल्यानंतर या तरुणी भरतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्याही प्रशिक्षण केंद्रात जाऊन मार्गदर्शन न घेता घरीच अभ्यास व शेतात सराव सुरू केला. यामध्ये कुटुंबीयांनीही त्यांना साथ दिली. गणेशोत्सवापूर्वीच त्या मुंबई पोलीस दलात रुजू होण्याची शक्यता आहे.
आम्ही शेतात सराव करत असताना गावातीलच काही लोक नावे ठेवत होते. मुलींनी पोलिसांत कशाला जायचे, हा प्रश्न विचारत होते. मात्र, घरातील मंडळींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे देशसेवा करण्याची संधी मिळाली.
- श्रद्धा जाधव, पाडळी हेळगाव
शेत हेच खेळाचे मैदान...
पोलीस भरतीत जायचे तर लेखी परीक्षाऐवढेच शारीरिक क्षमतेला महत्त्व आहे. यामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडीच्या चाचण्या देणे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे शेतात जाऊन धावण्याचा सराव केला. तर गोळा फेकसाठी गोळा व इतर साहित्य खरेदी करूनच सराव केला. यासाठी शेत हेच आमच्यासाठी खेळाचे मैदान होते, असे मत पाडळी हेळगाव येथील अश्विनी जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोलिसांचे लहानपणापासून आकर्षण होते. आज कर्मचारी म्हणून दाखल होत असले तरी अधिकारी होण्याचे स्वप्न मला शांत बसू देणार नाही. त्यामुळे अधिकारी होण्यासाठीचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.
- सुप्रिया जाधव, पाडळी-हेळगाव