बंदूक, देवतांच्या मूर्ती, वीरगळ, भांडी, नाणी-मनकर्णिकेच्या गर्भात सापडल्या पुरातन वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:36+5:302021-03-09T04:26:36+5:30

कोल्हापूर : जर्मन बनावटीची बंदूक, पुंगळ्या, तांब्याचे शिवलिंग, घड्याळ, नाणी, काचेचे कंदील, कोरीव दगड, कृष्ण, शिवलिंग, अश्वारूढ पार्वती, अन्नपूर्णादेवी ...

Guns, idols of deities, rings, utensils, coins, antiques found in the womb of Manakarnike | बंदूक, देवतांच्या मूर्ती, वीरगळ, भांडी, नाणी-मनकर्णिकेच्या गर्भात सापडल्या पुरातन वस्तू

बंदूक, देवतांच्या मूर्ती, वीरगळ, भांडी, नाणी-मनकर्णिकेच्या गर्भात सापडल्या पुरातन वस्तू

कोल्हापूर : जर्मन बनावटीची बंदूक, पुंगळ्या, तांब्याचे शिवलिंग, घड्याळ, नाणी, काचेचे कंदील, कोरीव दगड, कृष्ण, शिवलिंग, अश्वारूढ पार्वती, अन्नपूर्णादेवी अशा देवतांच्या मूर्ती, वीरगळ. तांबे व कास्याची भांडी, तांब्या, मापटे, बॅटरी अशा अनेकविध पुरातन वस्तू मनकर्णिका कुंडाच्या गर्भातून बाहेर निघाल्या आहेत. अंबाबाई मंदिराच्या आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने याच्या उत्खननाचे काम सध्या सुरू असून पाण्याचे जिवंत झरे सापडण्यासाठी आणखी १३ फुटांपर्यंत खोदाई करण्यात येणार आहे. पुढील दीड महिन्यात कुंडाचे मूळ रूप प्रकाशात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मनकर्णिका कुंडाच्या उत्खननासंबंधी माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुयश पाटील, मंदिर व मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, पुरातत्त्व खात्याचे उत्तम कांबळे, नियंत्रण कक्षाचे राहुल जगताप, अभिजीत पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, सध्या कुंडाची २७ फुटांपर्यंतची खोदाई झाली असून आणखी १३ फुटांपर्यंत खोदाई होण्याची शक्यात आहे. या खोदाईदरम्यान कुंडाच्या आवारात शिवलिंगाची लहान मंदिरे, ओवऱ्या, वीरगळ या वास्तू प्रकाशात आल्या आहेत. तर तांबे, पितळ, कास्याचे तांबे, बादली, मापटे, बंदुकीच्या पुढची नळी, तांब्याचे पुंगळे, टाक, नाणी, कोरीव दगड असे अनेक साहित्य मिळाले आहे. त्या साहित्याची त्या त्या दिवशी नोंद करून ते सुरक्षित ठेवण्यात आले आहे. खोदाई पूर्ण झाल्यावर कुंडाची डागडुजी व सुधारणा करून कुंडाचे मूळ स्वरूप प्रकाशात आणले जाईल.

---

केंद्रीय पुरातत्त्वची मदत घेणार

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, भूकंप, अतिवृष्टी असे वातावरणीय बदल झेलूनही हजारो वर्षे टिकून राहिलेल्या अंबाबाई मंदिराचे सेन्सर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. याशिवाय वास्तू व शिल्पांचे जतन संवर्धन, नूतनीकरण, सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याची मदत घेणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. छतावरील कोबा काढण्यासाठी पुरातत्त्व खात्याचे मार्गदर्शन घेणार असल्याचे अमरजा निंबाळकर यांनी सांगितले.

--

Web Title: Guns, idols of deities, rings, utensils, coins, antiques found in the womb of Manakarnike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.