गुंड स्वप्निल तहसीलदार गजाआड

By Admin | Updated: July 31, 2015 01:21 IST2015-07-31T01:21:39+5:302015-07-31T01:21:39+5:30

फ्लॅट फोडून कारवाई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

Gund Swapnil Tehsildar Gajaad | गुंड स्वप्निल तहसीलदार गजाआड

गुंड स्वप्निल तहसीलदार गजाआड

कोल्हापूर : खून, खुनाची सुपारी घेणारा एस.टी. गँगचा म्होरक्या स्वप्निल संजय तहसीलदार (वय ३५, रा. श्रीरंग अपार्टमेंट, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) याच्या गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी सायंकाळी फ्लॅटचा दरवाजा फोडून मुसक्या आवळल्या. तहसीलदारच्या मुसक्या आवळल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. तीन पोलीस निरीक्षक व पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने ही कारवाई केली. पोलिसांनी त्याच्या गळपट्टीला धरून जिन्यावरून त्याला फरफटत आणले. त्यामुळे त्याचा रुबाब चांगलाच उतरला.
तहसीलदारचा मुस्कॉन लॉन येथे २ मे २०१५ रोजी वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता. त्यावेळी त्याने पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु तो पोलिसांना चकवा देत होता. त्याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, महाडिक वसाहतीतील स्वप्निल तहसीलदार हा एस.टी. गँगचा म्होरक्या आहे. सुपारी घेऊन खून करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे, असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर पोलीस दफ्तरी नोंद आहेत. खून प्रकरणातील संशयित आरोपींना जामिनावर सोडण्यात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. त्यातच गेल्या आठवड्यात त्याचा थेट डी गँगशी संबंध असल्याची चर्चा वृत्तपत्रांतून झाल्यावर पोलीस त्याच्या मागावरच होते.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर सदर बाजार येथील शाहू कॉलेज ते मस्जिद या परिसरात सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी, तहसीलदार याला घरात जाऊन पकडायचे आहे, असे सांगून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, राजारामपुरीचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्यासह सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा घेऊन ते महाडिक वसाहतीकडे वळले. येथील श्रीरंग अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर घरामध्ये त्याची आई व पत्नी होती. तो दुसऱ्या खोलीमध्ये दार लावून बसला. पोलीस आल्याचे पाहताच आईने आरडाओरडा सुरू केला व कारवाईस विरोध केला. यावेळी पोलिसांनी स्वप्निलला शरण येण्यास सांगितले. परंतु, त्याने विरोध दर्शविला. शेवटी दार मोडून स्वप्निलला जेरबंद केले. त्यानंतर त्याला फरफटतच पोलिसांनी जिन्यावरून खाली आणले. अचानक झालेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. या कारवाईत अधिकाऱ्यांसह कॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर, अमर आडूळकर, सुहास पोवार, अशोक पाटील, किरण गावडे, सचिन पाटील, समीर मुल्ला, परशुराम गुजरे, प्रकाश परब, विलास गेंजगे, आदींनी भाग घेतला.
उडी टाकण्याची आईची धमकी
स्वप्निलला पोलिसांनी पकडल्यावर त्याच्या आईने दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेची कारवाई काही काळ थांबली. महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्याजवळ थांबवून पोलिसांनी तहसीलदारला पकडले.
महापालिका निवडणूक लढविण्याचा बेत...
महापालिकेचे आरक्षण व प्रभाग निश्चिती आज, शुक्रवारी आहे. या पार्श्वभूमीवर तो घरामध्ये तळ ठोकून होता. त्याने अडीच महिन्यांपूर्वी थाटामाटात वाढदिवस साजरा केला होता. त्याची ऊठबस असलेल्या कदमवाडी परिसरातून महापालिकेची निवडणूक लढविण्याचे त्याने ठरविले होते. बिनविरोध निवडून येण्यासाठी त्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, पोलिसांनी गुरुवारी सायंकाळीच त्याला अटक केली.
कऱ्हाडमध्ये वाळूचा ठेका...
गुंड स्वप्निल तहसीलदारने कऱ्हाडमध्ये वाळूचा ठेका घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, तो खरोखरच वाळूचा ठेका घेतो का? त्याचे अन्य व्यवसाय काय? या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत.
पंचनाम्यावर आईची सही...
स्वप्निलला अटक केल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घराजवळ थांबून होते. अटक पंचनामा पूर्ण केल्यानंतर स्वप्निलच्या आईने घरामध्ये अटक पंचनाम्यावर सही केली. त्यानंतर सर्व पोलीस तेथून बाहेर पडले. गुन्ह्यांचा आलेख वाढताच
तहसीलदारवर २००४ पासून २०१५ पर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी, जबरी चोरी, गंभीर दुखापत, गर्दी व मारामारीचे १० ते १५ गुन्हे गांधीनगर, शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, आदी पोलीस ठाण्यांत नोंद आहेत. गडमुडशिंगी येथील एका व टेंबलाईवाडी उड्डाणपूल येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणात तो संशयित आहे. खून प्रकरणांतील संशयितांना बाहेर काढण्यासाठी तो पटाईत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gund Swapnil Tehsildar Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.