कोल्हापूर: गणेश आगमन मिरवणुकीत गाणी लावण्याच्या वादातून तसेच वर्चस्ववादातून तरुणाने बंदुकीचा धाक दाखवत महिलांना तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. पाचगाव येथे काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.उद्या, बुधवारी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. दरम्यानच, शहरातील गणेश मंडळांकडून साऊंट सिस्टीम, वाद्यांचा गजरात बाप्पाच्या आगमन मिरवणुका सुरु आहेत. अशातच पाचगाव येथील एका मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकीवेळी गाणी लावण्यावरुन वाद झाला. यातून संबंधित तरुणाने आपल्या कारमध्ये ठेवलेली बंदूक काढून भर रस्त्यात महिलांना तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.या व्हिडिओत संबंधित तरुण आपल्या कारकडे धावत येताना दिसतो. कारमधून बंदूक काढतो अन् थेट कार्यकर्त्यांवर रोखतो. संबंधित तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, याप्रकारमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला.
गणेश आगमन मिरवणुकीत वर्चस्ववादातून दाखवला बंदुकीचा धाक, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:25 IST