गुजरातच्या लेखकांचे ‘दाक्षिणायन’
By Admin | Updated: November 24, 2015 00:21 IST2015-11-23T23:49:18+5:302015-11-24T00:21:13+5:30
मेघा पानसरे यांची माहिती : कोल्हापुरात गुरुवारी आगमन, संवाद साधणार

गुजरातच्या लेखकांचे ‘दाक्षिणायन’
कोल्हापूर : देशातील सांस्कृतिक बहुविविधतेला विरोध करणाऱ्या शक्ती वरचढ होऊन अशांतता माजवित आहेत. अशा स्थितीत चालू घडामोडी आणि निर्माण झालेले प्रश्न याबद्दल लोकभावना जाणून घेणे, तसेच साहित्यिकांची सामाजिक जबाबदारी समजून घेण्यासाठी परस्पर संवाद घडवून आणणे, या उद्देशाने गुजरातमधील मान्यवर लेखक, साहित्यिकांनी ‘दाक्षिणायन’ मोहीम आयोजित केली आहे. ही मोहीम कोल्हापुरात गुरुवारी (दि. २६) येणार आहे, अशी माहिती श्रमिक प्रतिष्ठानच्या विश्वस्त सदस्य डॉ. मेघा पानसरे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. पानसरे म्हणाल्या, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांची हत्या झाली. त्यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. तसेच दादरी येथील घटना पाहता देशातील सार्वजनिक जीवनातील असहिष्णुता वाढत आहे. त्यावर अस्वस्थ झालेले अनेक साहित्यिक-कलावंत यांनी पुरस्कार परत केले आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील साहित्यिक गणेश देवी व अन्य साहित्यिक, लेखक हे ‘दाक्षिणायन’ करीत आहेत. याअंतर्गत ते पुणे, कोल्हापूर व धारवाड येथे अनुक्रमे बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी जाणार आहेत. त्या-त्याठिकाणचे साहित्यिक, कलाकार, कार्यकर्ते, अभ्यासक यांच्याशी ते संवाद साधतील. श्रमिक प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दसमा, कनवा, अवनि, अशा कोल्हापुरातील विविध संस्थांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. शरद नावरे, दिलीप पवार, एस. बी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कार्यक्रम असा..
बुधवारी पहिली भेट पुणे येथे देऊन हा जत्था गुरुवारी कोल्हापुरात येईल. त्यादिवशी सकाळी साडेदहा वाजता हा जत्था पानसरे यांच्या बिंदू चौकातील कार्यालयास भेट देईल. सकाळी अकरा वाजता देवल क्लबच्या भांडारकर कलादालनात युवा साहित्यिकांशी संवाद आणि सायंकाळी पाच वाजता प्रबोध परीख यांचे तिथेच व्याख्यान.
मोहिमेतील सहभागी लेखक
गणेश देवी, अनिल जोशी, रमेश ओझा, कानजी पटेल, उत्तम परमार, परेश नायक, मानिशी जानी, प्रबोध पारीख, सचिन केतकर, दिलीप जव्हेरी, सुरेखा देवी या गुजरातमधील लेखकांचा या मोहिमेत सहभाग असणार आहे. हे लेखक कोल्हापुरातील युवा साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत. यात संदेश भांडारे, अनोश मालेकर, संजीव खांडेकर, प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोविंद काजरेकर यांचा समावेश आहे. ‘दाक्षिणायन’मधील विचारमंथनात गुजरातमधील लेखकांसह महाराष्ट्रातील डॉ. राजन गवस, शरद नावरे, उदय नारकर, रणधीर शिंदे, शरद भुताडिया, सुनीलकुमार लवटे, अशोक चौसाळकर, मोहन पाटील, नीलम माणगावे, रफीक सूरज, गौतमीपुत्र कांबळे हे सहभागी होतील, असे डॉ. पानसरे यांनी सांगितले.