‘सारथी’च्या उपकेंद्रातून पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:35+5:302021-06-28T04:17:35+5:30
सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत ‘सारथी’चे उपकेंद्र कोल्हापूरमध्ये करण्यात यावे ही प्रमुख मागणी होती. त्याची पूर्तता राज्य सरकारने ...

‘सारथी’च्या उपकेंद्रातून पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत ‘सारथी’चे उपकेंद्र कोल्हापूरमध्ये करण्यात यावे ही प्रमुख मागणी होती. त्याची पूर्तता राज्य सरकारने करून राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील जागेत या उपकेंद्राचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शनिवारी उद्घाटन केले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी वेगाने पाऊल उचलत या केंद्राबाबतची सकल मराठा समाजाची मागणीची पूर्तता केली आहे. त्यांनी या महाविद्यालयाच्या कमवा व शिका योजनेच्या इमारतीचे रूप अवघ्या १८ तासांमध्ये पालटले. या इमारतीमध्ये सोमवारपासून उपकेंद्राचे काम सुरू होणार आहे. त्याठिकाणी सध्या दोन कर्मचारी कार्यरत राहणार असून ते याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना ‘सारथी’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, योजनांची माहिती दिली जाणार आहे. या उपकेंद्रात आवश्यक मनुष्यबळ, संगणक, फर्निचर, आदी सुविधांबाबतच्या पूर्ततेबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाठपुरावा केला जाणार आहे. इमारतीच्या डागडुजीचे किरकोळ स्वरूपात काम अद्याप बाकी आहे. त्याची पूर्तता झाल्यानंतर या केंद्रातून कामाची गती वाढणार आहे.
प्रतिक्रिया
या उपकेंद्राचे काम सोमवारपासून सुरू होईल. त्याठिकाणी सध्या तात्पुरत्या स्वरूपातील दोन कर्मचारी कार्यरत असणार आहेत. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतील. आवश्यक मनुष्यबळ आणि अन्य पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
-अशोक पाटील, निबंधक, सारथी संस्था