सातारचे जलयुक्त शिवार राजस्थानसाठी मार्गदर्शक
By Admin | Updated: July 28, 2015 00:29 IST2015-07-27T22:17:27+5:302015-07-28T00:29:57+5:30
प्रशासन लोकसहभाग आणि प्रसिद्धी माध्यमे यांची मोट बांधून सातारमध्ये जलक्रांती घडविण्याच्या दिशेने पावले उचलली़

सातारचे जलयुक्त शिवार राजस्थानसाठी मार्गदर्शक
महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या प्रभावी कामांची महती राजस्थानमध्ये पोहोचली आहे. राजस्थानमध्ये अशाच प्रकारे अभियान राबवून शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांच्यासह सातारचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना खास सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते. साताराचे जलयुक्त शिवार राजस्थानसाठी निश्चितपणे मार्गदर्शक आणि प्रेरणादायक ठरले आहे़ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी़ श्रीकांत, विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी आणि पत्रकार या टीमच्या माध्यमातून जिल्ह्याची भौगोलिक रचना, ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना, जिल्ह्याची पाण्याची गरज, पीकपद्धती याबाबत अभ्यास, निरीक्षण करून सूक्ष्म नियोजन केले़. शाश्वत जलसाठे निर्माण करण्यासाठी तालुकानिहाय, डोंगर, विहिरी, जुने बंधारे आवश्यक असणारे माणसी पाणी, याबाबत बजेट तयार करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रशासन लोकसहभाग आणि प्रसिद्धी माध्यमे यांची मोट बांधून सातारमध्ये जलक्रांती घडविण्याच्या दिशेने पावले उचलली़माण, खटावसारख्या दुष्काळग्रस्त भागात माणगंगा नदीचे पुनर्जीवन हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला़ पाझर तलावांतील गाळ काढणे, लोकसहभाग वाढविणे, पाण्याविषयी जनजागृती, बंधाऱ्यांची निर्मिती, वृक्षारोपण अशी कामे मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली़ यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील किवळ ओढा-जोड प्रकल्प हा सर्वप्रथम यशस्वी ठरला़ वाई येथील गुळुंब, चांदक याही ओढा-जोड प्रकल्पाचे प्रात्यक्षिक यशस्वी ठरले आहे़
राज्यपातळीवर तसेच पर्यायाने देश पातळीवर अभियानाला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी मुदगल यांनी ११ तालुक्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले़ त्याला मोठा प्रतिसाद देत पत्रकारांनी तालुके दत्तक घेतले. तालुके दत्तक घेणारी ही योजना पत्रकारांच्या माध्यमातून केवळ सातारामध्ये घडली आहे़
राज्यपाल सी़ विद्यासागर राव आणि पंतप्रधानांचे सल्लागार एस़ रामादुराई यांनी विशेष दौऱ्याचे आयोजन करून वाई येथील ओढा जोड प्रकल्पास भेट दिली. या कामांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विशेष दौरा आयोजित करून साताऱ्यात झालेल्या कामांविषयी समाधान व्यक्त केले़
सातारा जिल्ह्यात झालेल्या कामाने प्रभावित होऊन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना जयपूर येथे झालेल्या कार्यशाळेत सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते. या कार्यशाळेत सचिव देशमुख यांनी जलयुक्त शिवार अभियनाची माहिती दिली तर जिल्हधिकारी मुदगल यांनी तासाभराच्या संगणकीय सादरीकरणातून जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व, जिल्ह्याची गरज, केलेले सूक्ष्म नियोजन, अंमलबजवाणी, मिळालेले यश आणि प्रसिद्धी माध्यमांचा प्रत्यक्ष मोठा सहभाग याविषयी माहिती दिली़
- प्रशांत सातपुते,
माहिती अधिकारी