गुऱ्हाळधारकांचा आज मोर्चा
By Admin | Updated: December 18, 2014 00:02 IST2014-12-17T23:27:33+5:302014-12-18T00:02:08+5:30
बंदला थंडा प्रतिसाद : ४२ हजार रव्यांची विक्री

गुऱ्हाळधारकांचा आज मोर्चा
कोल्हापूर : गुळाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी उद्या, गुरुवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गुऱ्हाळधारकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आज ४२ हजार गूळ रव्यांची विक्री झाली.
गूळ उत्पादक असोसिएशनने ‘गुऱ्हाळ बंद’ आंदोलनाचा निर्णय घेतला आहे; पण याला काही गुऱ्हाळधारकांनी विरोध केला आहे. सोमवार (दि. १५)पासून गुऱ्हाळे बंद ठेवण्याचे आवाहन असोसिएशनने केले असले तरी त्याला थंडा प्रतिसाद मिळालेला आहे. दरम्यान, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मोर्चादिवशी शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे सांगितले आहे.
संघटनेने वाहने रोखली !
काल, मंगळवारी मध्यरात्रीपासून बाजार समितीत गुळाची वाहने येण्यास सुरुवात झाल्याचे समजताच आज पहाटे पाचपासून गूळ उत्पादक असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुळाची वाहने दारातच रोखली. दुपारपर्यंत समितीत वाहने आली नाहीत.
स्थगितीची शक्यता
गुऱ्हाळ बंद करण्यावरून शेतकऱ्यांमधूनच दोन मतप्रवाह आहेत. त्यात शासनाने गुळावरील नियमन कायम ठेवण्याचा निर्णय घेऊन सकारात्मक चर्चेला सुरुवात केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करून शासनाशी चर्चा करावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित अथवा बंदचा कालावधी कमीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.