अनाथांच्या लग्नास शासन पालक

By Admin | Updated: March 19, 2016 00:15 IST2016-03-19T00:08:27+5:302016-03-19T00:15:17+5:30

तहसीलदारांनी केले कन्यादान : पुरोगामी महाराष्ट्रात घडला नवा इतिहास

Guardian of the orphans | अनाथांच्या लग्नास शासन पालक

अनाथांच्या लग्नास शासन पालक

आजरा : गावभेट समाधान योजनेंतर्गत आजरा तालुक्यातील कासारकांडगाव येथील मोहन रामू कांबळे व बुजवडे (ता. चंदगड) येथील शुभांगी श्रीधर कांबळे यांचा प्रशासनाच्यावतीने विवाह लावून देण्यात आला. पुरोगामी सोहळ्यातील दलित कुटुंबातील मुलींच्या कन्यादानाची जबाबदारी स्वत: तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी पार पडली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साक्षीने हा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला. मोहन व शुभांगी दोघांच्याही घरची परिस्थिती अत्यंत बेताची. मोहनला वडील नाहीत, तर शुभांगीला आई नाही. त्यामुळे विवाहाचा विषय काढणार कोण? हा प्रमुख प्रश्न होता. विवाहाकरिता येणारा खर्च हा प्रश्न शुभांगीच्या कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा होता. सर्व परिस्थिती समजावून घेऊन तहसीलदार ठोकडे यांनी शुभांगीचे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला.
तहसीलदारांनीच महत्त्वाची भूमिका घेण्याचे ठरविल्यानंतर गावकऱ्यांबरोबर महसूल विभागच कामाला लागला. गावकऱ्यांसह शासकीय कर्मचाऱ्यांनी जशी जमेल तशी मदत केली. माजी पंचायत समिती सदस्यांनी जबाबदारी स्वीकारून हळद, साखरपुडा याकरिता पुढाकार घेतला. गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी फौंडेशनच्यावतीने कावेरी चौगुले यांनी मणी-मंगळसूत्राची जबाबदारी उचलली, तर मुलाच्या पेहराव्याचा खर्च मंडल अधिकारी म्हाळसाकांत देसाई यांनी केला. मनोहर उर्फ बंडा बापट यांनी पौराहित्य केले, तर मानसिंग देसाई यांच्यासह ग्रामस्थांनी संसारोपयोगी साहित्याकरिता हातभार लावला.
या विवाह सोहळ्यास जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपविभागीय अधिकारी कीर्ती नलवडे, भुदरगडच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल, निवासी नायब तहसीलदार डी. डी. कोळी, सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले, परिक्षेत्र वनअधिकारी राजन देसाई या शासकीय अधिकाऱ्यांसह सभापती विष्णुपंत केसरकर, उपसभापती दीपक देसाई, जि. प. सदस्या संजीवनी गुरव, पं. स. सदस्या अनिता नाईक, आजऱ्याच्या सरपंच नयन भुसारी, रमेश रेडेकर, सरपंच प्रकाश कांबळे, अरुण देसाई, राजू होलम उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Guardian of the orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.