पालकमंत्र्यांनीही कोल्हापूरकरांची माफी मागावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:14+5:302021-06-20T04:17:14+5:30
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे काम प्रत्यक्षात ५० टक्केही झालेले नाही. त्यामुळे वेळेत ...

पालकमंत्र्यांनीही कोल्हापूरकरांची माफी मागावी
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे काम प्रत्यक्षात ५० टक्केही झालेले नाही. त्यामुळे वेळेत काम न झाल्याने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याप्रमाणे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही कोल्हापूरकरांची माफी मागावी, अशी मागणी भाजपने शनिवारी केली.
शहर अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ग्रामविकासमंत्री आणि पालकमंंत्री पाणी योजना पूर्ण होण्याची मुदत वेगवेगळी सांगत आहेत. ते आता ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत असले तरी ५० टक्केही काम झालेले नाही. योजनेबद्दल दिशाभूल करणारी माहिती देऊ नये. मंत्री मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्री आहेत; पण तिथे कधीही ते जात नाहीत. पण सातत्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर खोटं बोल, पण रेटून बोल याप्रमाणे चुकीचे आरोप करतात.
भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, थेट पाईपलाईन योजनेची मंजुरीची किंमत ४२५ कोटी ४१ लाख रुपयांची आहे. पण निविदा १५.४८ टक्क्यांनी अधिकची म्हणजे ४८८ कोटींवर रकमेची काढण्यात आली. आतापर्यंत योजनेवर ३५० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाला आहे; पण अपेक्षेप्रमाणे काम झालेले नाही. जॅकवेल, इंटेकवेलचे काम अपूर्ण आहे. हेडवर्कचे कामही झालेले नाही. तरीही मंत्री योजनेचे काम ८५ टक्के झाल्याचे खोटे सांगत आहेत. या योजनेत भ्रष्टाचार आणि अनेक गंभीर चुका झाल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला.
चौकट
पाच वर्षे तुम्ही काय केले..?
भाजपचे सरकार असताना योजनेतील त्रुटी आणि कामांच्या दिरंगाईबद्दल पाच वर्षे सरकारकडे का तक्रार केली नाही, अशा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी नगरसेवक ठाणेकर म्हणाले, योजनेच्या अंमलबजावणीची यंत्रणा महापालिका आहे. त्यामुळे आम्ही सरकारपेक्षा महापालिकेच्या पातळीवरच पाठपुरावा करीत राहिलो.