सराफ संघाचा विकास हाच अजेंडा
By Admin | Updated: October 8, 2014 00:30 IST2014-10-08T00:25:13+5:302014-10-08T00:30:12+5:30
हालचाली निवडणुकीच्या : उमेदवारांची प्रचार यंत्रणा कामाला

सराफ संघाचा विकास हाच अजेंडा
कोल्हापूर : कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांची शिखरसंस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या अध्यक्षपदावर दावा केलेल्या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी संघाचा विकास हा आपला अजेंडा सभासदांसमोर ठेवला आहे. निवडणुकीला फक्त एक दिवस बाकी उरल्याने प्रचार यंत्रणेलाही आता वेग आला आहे. अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी की पूर्वानुभवावर विश्वास यावरच आता मतदारांचा कौल ठरणार आहे.
कोल्हापूर सराफ संघाची निवडणूक गुरुवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे. अध्यक्षपदासाठी सुरेश गायकवाड आणि संजय खद्रे इच्छुक आहेत. सुरेश गायकवाड यांनी दोनवेळा भूषविलेल्या अध्यक्षपदाच्या आणि कामाच्या जोरावर या पदावर दावा सांगितला आहे. त्यांनी आपल्या प्रचाराचे पत्रकच प्रसिद्ध केले असून, आजवर केलेल्या कामांची यादी दिली आहे. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अंगाडियाने माल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ स्थापन करणार, अंबाबाईची मूर्ती योग्य ठिकाणी बसविण्याचा प्रयत्न, सभासदांना कायद्यांची माहिती देणे व कोल्हापूरच्या कलाकुसरीच्या दागिन्यांची ओळख देशभरात पोहोचविणे अशी कामे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
संघावर आता नव्या चेहऱ्यांना काम करण्याची संधी मिळायला हवी, अशी एक मानसिकता आहे. संघाचे विद्यमान उपाध्यक्ष असलेले संजय खद्रे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. आपल्या प्रचारात त्यांनी सराफ व्यावसायिकांसाठी कार्यशाळा,
दाग-दागिन्यांची प्रदर्शने भरविणे, सराफ व्यावसायिकांचा सर्वांगीण विकास, सभासदांना कायद्यांची माहिती मिळावी हे मुद्दे सभासदांना पटवून देत आहेत. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांनी
संघाचा आणि सभासदांचा विकास हाच विषय अजेंड्यावर ठेवला
असला, तरी सभासद मतदारांचा कौल गुरुवारी पतपेटीत बंद होणार
आहे. (प्रतिनिधी)
सराफ संंघाचा आणि कोल्हापूरच्या सराफ बाजाराचा विकास करण्याची संधी आता नव्या चेहऱ्याला देखील मिळाली पाहिजे. संघाचा अध्यक्ष तरुण आणि सुशिक्षित असला, तर नवनवीन संकल्पना राबविता येतील. - संजय खद्रे (इच्छुक उमेदवार)
ंमी अध्यक्ष म्हणून आजवर केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा ही निवडणूक लढवित असून, राजस्थानी सभासदांनीच मला यासाठी पांिठंबा दिला आहे.
ं- सुरेश गायकवाड
(इच्छुक उमेदवार)
अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार
आज सराफ संघाचे एक माजी उपाध्यक्ष सभासदांना अध्यक्ष रणजित परमार यांच्या विरोधात पत्रके वाटत असल्याचे निदर्शनास आले. मी माझ्या अध्यक्षपदाच्या काळात किंवा राजकीय कारकिर्दीत एक रुपयांचाही भ्रष्टाचार केलेला नाही. काही कामधंदा नसलेली माणसं संघावर निवडून येण्यासाठी असले उद्योग करीत आहेत. सभासदांना कोण चांगले, कोण वाईट हे माहीत आहे. त्यामुळे त्यांनी असले धंदे बंद करावेत. माझ्यावर केलेल्या आरोपांविरोधात मी संबंधित व्यक्तीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे परमार यांनी सांगितले.