भूजल पातळी सव्वा दोन फुटांनी घसरली

By Admin | Updated: February 15, 2016 01:07 IST2016-02-15T00:42:48+5:302016-02-15T01:07:49+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात टंचाई झळा : पाच वर्षांत पहिल्यांदाच पातळी खालावली; शाहूवाडीची भूजल पातळी साडेचार फुटांनी घसरली

Ground water level dropped by two and a half feet | भूजल पातळी सव्वा दोन फुटांनी घसरली

भूजल पातळी सव्वा दोन फुटांनी घसरली

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भूजल पातळी झपाट्याने खालावत चालली असून कोल्हापूर जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सरासरी सव्वा दोन फुटांनी घसरली आहे. पाऊस कमी पडल्याचा सर्वाधिक फटका शाहूवाडी तालुक्याला बसला असून येथील भूजल पातळी सर्वाधिक साडेचार फुटांनी खाली गेली आहे. त्यामुळे मार्चनंतर बहुतांशी विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडण्याची भीती व्यक्त होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळला तरी कोल्हापूरला आतापर्यंत त्याची झळ कधी पोहोचली नाही. येथे मुबलक पाऊस व धरणे असल्याने पाणीटंचाई कधी जाणवलीच नाही, पण यंंदा परिस्थिती काहीशी वेगळी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १७७२ मिलीमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरासरीपेक्षा ४८ टक्केच म्हणजे केवळ ८५६.९३ मिलीमीटर पाऊस झाल्याने त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाचा पारा जसा वाढत आहे, तशी जमिनीची भूक वाढू लागली आहे. जिल्ह्याची भूगर्भातील पाणी पातळी घसरली असून गेल्या पाच वर्षांत एवढ्या खाली पाणी कधी गेलेच नाही. जिल्ह्याची सरासरी सव्वा दोन फुटांनी भूजल पातळीत घटली असून सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यात साडेचार फुटांनी भूजल पातळी खाली गेली आहे. शाहूवाडी तालुक्यात दरवर्षी सरासरी १५४२ मिलीमीटर पावसाची नोंद होते, पण यंदा १०८२.९० मिलीमीटरच पाऊस झाला आहे. शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड, भुदरगड तालुक्यात जांभा खडकाचा मोठा थर आहे. परिणामी जांभा खडकाच्या पोकळीतून पाणी कमी प्रमाणात खाली उतरते, येथे प्रत्येक वर्षी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच पाण्याची पातळी स्थिर राहते. उर्वरित तालुक्यांपेक्षा शाहूवाडीची पातळी घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शाहूवाडीपाठोपाठ करवीर तालुक्यातील पाण्याच्या पातळीत अडीच फुटांनी
घसरण झाली आहे. पाणीटंचाईची दाहकता लक्षात येते. प्रत्येक महिन्याला पातळीत घट होत असून मार्च-एप्रिलमध्ये विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता जात आहे.
जिल्ह्यात नदीच्या पाण्यावरील सिंचनापाठोपाठ विहिरीवर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उपसा
केला जातो. मात्र, विहीरीच्या पाण्यांची पातळी खालावल्याने अनेक बागायतदारही हवालदिल झाले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठीदेखील विहिरींचाच तसेच कूपनलिकांचा आधार घेतला जातो. मात्र, कूपनलिकांचे पाणीही गायब होत असल्याने नागरिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

Web Title: Ground water level dropped by two and a half feet