‘ग्रीन कोल्हापूर, क्लिन कोल्हापूर’
By Admin | Updated: October 20, 2015 00:21 IST2015-10-20T00:00:09+5:302015-10-20T00:21:23+5:30
एस फोर ए विकास आघाडीचा जाहीरनामा

‘ग्रीन कोल्हापूर, क्लिन कोल्हापूर’
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी एस फोर ए विकास आघाडीच्यावतीने जाहीरनामा सोमवारी आघाडीचे नेते राजू माने यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला. त्यामध्ये ‘ग्रीन कोल्हापूर, क्लिन कोल्हापूर’ची संकल्पना मांडली आहे तसेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यापेक्षा आहे त्याच हद्दीचा ‘को.म.न.पा. बाँड’ पद्धतीने विकास करावा, अशी अभिनव संकल्पना मांडली.
महापालिका निवडणुकीत एस फोर ए विकास आघाडीच्यावतीने
१३ उमेदवार निवडणुकीत उतरले असून ते सर्वच्या सर्व विजयी होतील, असा दावा आघाडीचे नेते राजू माने यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, आम्ही निवडलेले आघाडीचे सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातीलच आहेत. आघाडीचा ‘ग्रीन कोल्हापूर, क्लिन कोल्हापूर’ हाच विकासाचा मुख्य अजेंडा आहे. याशिवाय शैक्षणिक विकासाला प्राधान्य, स्वच्छ व भरपूर पाणीपुरवठ्यास प्राधान्य, आरक्षित क्रीडांगणांचाविकास, पार्किंगची कोंडी फोडण्यासाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था, पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यासाठी अंबाबाई मंदिर केंद्रस्थानी ठेवून पर्यटन विकासाचा आराखडा तयार करणार, कोल्हापूर शहरातील नागरिकांची सुरक्षा राखण्यासाठी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविणार, महिलांसाठी व तरुणींसाठी स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणार आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीत सोयी-सुविधा देऊन चित्रनगरीला वैभव मिळवून देणार, अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून विजेवरील खर्च कमी करणार असल्याचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. (प्रतिनिधी)
हद्दवाढीला विरोधच
शहराच्या हद्दवाढीला विरोध दर्शविताना, हद्दवाढ करायचीच असेल, तर परिसरातील फक्त १७ गावांची करण्यापेक्षा हुपरीपासून कुडित्रेपर्यंत हद्दवाढ करावी. अन्यथा, आहे त्याच हद्दीत ‘को.म.न.पा. बाँड’ काढून शहराचा विकास करावा. हे बाँड शहरातील नागरिकांना काही रकमेला विकत देऊन त्याद्वारे विकासकामे करावीत, या विकासकामांतून उपलब्ध होणाऱ्या रकमेचा लाभांश बाँडधारकांना देता येतो. ही शहराच्या विकासासाठी अभिनव योजना राजू माने यांनी मांडली.