हिरवा चारा विक्रीही सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:30+5:302021-02-23T04:37:30+5:30

सादिक नगारसे, लोकमत न्यूज नेटवर्क हलकर्णी : अलीकडे सोशल मीडियाचा वापर कोण कशासाठी करेल, हे सांगता येत नाही. गडहिंग्लज ...

Green fodder sales are also on social media | हिरवा चारा विक्रीही सोशल मीडियावर

हिरवा चारा विक्रीही सोशल मीडियावर

सादिक नगारसे,

लोकमत न्यूज नेटवर्क

हलकर्णी : अलीकडे सोशल मीडियाचा वापर कोण कशासाठी करेल, हे सांगता येत नाही. गडहिंग्लज परिसरात सोशल मीडियावरून चक्क हिरवा मक्याचा चारा विक्री केला जात आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ओल्या वैरणीचा प्रश्न सर्वत्र भेडसावत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील जाहिरात पाहून दूध उत्पादक चाऱ्याची शोधाशोध करत आहेत.

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. अल्पभूधारक व भूमिहीन दूध उत्पादकांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे एका एका शेतकऱ्याकडे किमान दोन-तीन दुभती जनावरे पाहावयास मिळतात. साखर कारखान्यांच्या हंगामात उसाचे वाडे हा हिरवा चारा म्हणून पर्याय असतो. चार महिने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न नसतो. मात्र मार्च ते जून या कालावधीत ओल्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू असते. याला पर्याय म्हणून हिरव्या मक्याचा वापर केला जातो. मक्का कणदार असल्याने दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त असतो. आगामी काळातील चारा टंचाई लक्षात घेऊन गडहिंग्लज परिसरातील शेतकऱ्यांनी हिरव्या मक्याचे मोठे प्लॉट तयार केले आहेत. स्वत:च्या जनावरांबरोबरच विक्रीसाठी एकर-दोन एकरचे प्लॉट आपणास पाहावयास मिळतात.

मका प्लॉटची विक्री कशी करायची, यासाठी थेट प्लॉटचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मक्याची जाडी व उंची, क्षेत्र, त्याची किंमत कळते. यावरून ज्यांना हवा आहे, ते थेट संपर्क साधत आहेत. आतापर्यंत घरे, वाहने, दागिने, जागा, शेती आदीची विक्री सोशल मीडियावरून करत असल्याचे आपण पाहिले. आता थेट हिरव्या चारा विक्रीसाठी या माध्यमाचा वापर सुरू केला आहे.

गुंठ्याला हजार रुपये

हिरव्या चाऱ्याची टंचाई पाहता, मक्याचा दर ठरविला जात आहे. मक्याच्या दर्जावर दर असला तरी सरासरी गुंठ्याला एक हजार रुपये दर गडहिंग्लज परिसरात आहे.

फोटो ओळी :

गडहिंग्लज परिसरात हिरव्या चाऱ्यासाठी असे मक्याचे प्लाॅट तयार केले आहेत. (फोटो-२२०२२०२१-कोल-गडहिंग्लज)

Web Title: Green fodder sales are also on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.