दारूच्या महापुराने आजरा मार्ग चिंब!
By Admin | Updated: December 2, 2014 00:21 IST2014-12-01T23:06:02+5:302014-12-02T00:21:52+5:30
लाखोंची दारू पकडली : आजऱ्यातही चोरटी विक्री

दारूच्या महापुराने आजरा मार्ग चिंब!
आजरा : आजरा-आंबोली मार्गावर गोव्याहून चोरट्या मार्गाने येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूसह ठिकठिकाणी विकल्या जाणाऱ्या गावठी दारूने हा मार्ग चिंब झाला असून, बेकायदेशीररीत्या ज्याची वाहतूक होते ते सर्व प्रकार या मार्गावर सुरू असल्याने आता सिंधुदुर्ग, आजरा सीमेवर वाहन तपासणी नाका उभारण्याची गरज आहे.
गेल्या आठवड्यात या मार्गावरून वाहतूक होणारी तब्बल ६४ लाख रुपयांची दारू वाहतूक करणारी वाहने उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतली. आजरा पोलिसांनी किणे येथे कारवाईचा बडगा उगारत २० हजारांची गोवा बनावटीची दारू ताब्यात घेतली. अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या दारू विक्री होताना दिसते.
मुळातच गोव्याहून आजरामार्गे धावणाऱ्या सर्वच वाहनांची तीन ते चार ठिकाणी तपासणी होते. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे दोन ठिकाणी तपासणी नाके आहेत. एवढी दक्षता घेतली जात असताना दारू वाहतूक करणारी वाहने आजपर्यंत येतातच कशी? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
सण-समारंभाच्या निमित्ताने किरकोळ स्वरूपात दारू या मार्गावरून आणली जात होती; परंतु अलीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून दारूची वाहतूक होऊ लागली आहे, ही गंभीर बाब आहे. आजरा पोलीस अचानक रात्री गस्त घालून वाहने तपासण्याचे प्रयोग करीत आहेत; पण आजरा-सिंधुदुर्ग सीमेवर कायमस्वरूपी नाक्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
तरुणाई मद्यविक्रीत
महाराष्ट्र बनावटीची व गोवा बनावटीची दारू यांच्या किमतीत मोठा फरक असल्याने गोवा बनावटीच्या दारूला मोठी मागणी आहे. आजऱ्यातून व्यवसायासाठी गोव्याला जाणाऱ्यांकडून राजरोसपणे दारू उपलब्ध होते.
‘गोव्या’वरच जत्रा, वराती
आजऱ्यासह चंदगड, भुदरगड भागांतील गावोगावच्या जत्रा, यात्रा, वराती व इतर कार्यक्रमही गोवा बनावटीच्या दारूमुळेच आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याचे चित्र आहे.