राजारामपुरी एक्स्टेंशनमध्ये जबरदस्त ‘टशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST2021-01-25T04:25:20+5:302021-01-25T04:25:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विनोद सावंत/ कोल्हापूर : संपूर्ण प्रभागच उच्चभ्रु वस्ती असणारा राजारामपुरी एक्स्टेंशन (प्रभाग क्रमांक ३९) हा प्रभाग ...

Great 'Tashan' in Rajarampuri extension | राजारामपुरी एक्स्टेंशनमध्ये जबरदस्त ‘टशन’

राजारामपुरी एक्स्टेंशनमध्ये जबरदस्त ‘टशन’

लोकमत न्यूज नेटवर्क

विनोद सावंत/ कोल्हापूर : संपूर्ण प्रभागच उच्चभ्रु वस्ती असणारा राजारामपुरी एक्स्टेंशन (प्रभाग क्रमांक ३९) हा प्रभाग आहे. महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांचे पत्ते कट झाले असून, पत्नी, वहिणी आणि मुलगीला रिंगणात उतरविले आहे. सध्याच्या घडीला उमेदवारांची संख्या कमी असली तरी इच्छुक सर्व तगडे उमेदवार असल्याने येथील निवडणूक गतवेळीप्रमाणेच चुरशीच होणार असे चित्र आहे. सध्या चार उमेदवारांची चर्चा आहे. यापैकी दोन उमेदवार काँग्रेसमधून एक उमेदवार भाजप, तर एक राष्ट्रवादी, जनसुराज्यशक्तीसाठी इच्छुक आहे. यामुळे शिवसेनेला येथून उमेदवार शोधावा लागणार आहे.

महापालिकेच्या गतवेळच्या निवडणुकीमध्ये या प्रभागात तुल्यबळ उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. साम, दाम, दंड भेद नीतीचा वापर झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे मुरलीधर जाधव यांनी बाजी मारली. भाजपचे विजय जाधव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. काँग्रेसचे अतुल पाटील यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेच्या उमेदवाराला २९९ मते मिळाली.

यंदाच्या निवडणुकीमध्ये हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने विद्यमान नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी शेजारीला प्रभाग क्रमांक ३७ राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, तर राजारामपुरी एक्स्टेंशनमधून त्यांच्या वहिणी, माजी महापौर दीपक जाधव यांच्या पत्नी दीपिका जाधव यांना रिंगणात उतरवले असून, त्यांनी जोरदार प्रचाराही सुरू केला आहे. जाधव कुटुंबीयांनी महापालिकेत आतापर्यंत पाचवेळा प्रतिनिधित्व केले आहे. दीपक जाधव दोनवेळा, तर मुरलीधर जाधव तीनवेळा विजयी झाले. यामध्ये दीपक जाधव यांनी महापौरपद भुषविले. मुरलीधर जाधव २०१० ते २०१५ मध्ये सलग पाच वर्षे विरोधी पक्षनेता होते, तर २०१५ ते २०च्या सभागृहात एक वर्ष स्थायी समिती सभापतिपद भुषवले. यंदाच्या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्यशक्तीचे नेते आमदार विनय कोरे आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या मागर्दशनानुसार पुढील दिशा ठरविणार आहेत.

मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे भाजपचे सरचिटणीस विजय जाधव यांनी पत्नी दीपाली जाधव यांना रिंगणात उतरविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विजय जाधव गेले २२ वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून सामाजिक कामात आहेत. आरोग्य शिबिर, एसटी पास वाटप अशा कामातून जनसंपर्क ठेवला आहे. कोरोना काळात त्यांनी मदतकार्य केले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रभागात विकासकामे केली आहेत. शहरातील गोरगरिबांना मोफत आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी त्यांची धडपड असते. मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांनी अनेकांना मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. ५५० जणांना व्हिलचेअर आणि कानातील मशीन दिली आहेत. रस्ते आणि एलईडी दिवे बसविले आहेत. या कामाच्या जोरावरच त्यांनी पत्नी दीपाली यांना निवडणुकीत उतरविण्याची तयारी केली आहे. महिला बचत गटामार्फत त्यांचाही चांगला जनसंपर्क आहे.

शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष अतुल पाटील यांनी पत्नी वैशाली यांना रिंगणात उतरविले आहे. अतुल आणि त्यांचे बंधू अनुप यांनी रोटरी क्लब, संयुक्त राजारामपुरी आणि जिद्द युवक संघटनेच्या माध्यमातून गेले २५ वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. महापूर आणि कोरोनामध्ये ५०० लोकांना धान्य, औषध वाटप केले. सीएसआर फंडातून जिल्हा प्रशासनाला ११ व्हेंटिलेटर मशीन दिली. वैशाली पाटीलही बचत गट, मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली असून, काँग्रेसमधून त्या इच्छुक आहेत. माजी नगरसेवक राजू पसारे यांनी कन्या किशोरी पसारे यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याही काँग्रेसमधूनच इच्छुक आहेत. राजू पसारे यांनी २०१०मध्ये महापालिकेत प्रतिनिधित्व केले असून, परिवहन समिती सभापतिपद भुषवले आहे. प्रभागात उद्यान विकसित केली. मंडलिक पार्क येथील सांडपण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.

चौकट

मुरलीधर जाधव राष्ट्रवादी ११७८

विजय जाधव (भाजप) ९८१

अतुल पाटील (काँग्रेस) ६८६

प्रदीप पोवार (शिवसेना) २९४

राजू पसारे (अपक्ष) १४७

प्रतिक्रिया

पाच वर्षांमध्ये ९ कोटी ५० लाखांची विकासकामे प्रभागात केली आहेत. यापैकी पाच कोटींची रस्त्याची कामे केली. शाहू जलतरण तलावासाठी ४० लाखांचा निधी मंजूर केला. जलतरण तलावालगतच्या उद्यानामध्ये दोन कोटी निधीतून ऑक्सिजन पार्कसह विविध कामे केली आहेत. स्थायी समिती सभापतिपदावर असताना शहरातील उद्यान, ओपन स्पेस विकसित केले.

मुरलीधर जाधव, विद्यमान नगरसेवक

चौकट

पाच वर्षांत झालेली कामे

शाहू जलतरण तलाव परिसरातील रस्ते

राजारामपुरी पाचवी गल्ली ते १५वी गल्लीतील रस्त्यांचे डांबरीकरण

बडोदा बँक ते लिंग्रस घर रस्ता

प्रभागात अनेक ठिकाणी हायमास्ट दिवे

तीन उद्यान विकसित केली.

लॉकडाऊनमध्ये अडचणीत सापडलेल्या ३०० रिक्षाचालकांना गणवेश वाटप

राजारामपुरी परिसरातील १७०० घरांमध्ये भाजीपाला, १५०० घरांमध्ये धान्य वाटप

चौकट

शिल्लक कामे

शाहू जलतरण तलाव ते पी. एन. पाटील घर रस्त्यावर खड्डे

जलतरण तलाव ते मंडलिक पार्क रस्ता खराब

शाहू जलतरण तलावातील डागडुजीची कामे रखडली.

भटक्या श्वानांचा त्रास, सहाव्या गल्लीतील रस्ता खराब.

काही रस्त्यावरील विद्युत खांबावरील वीजपुरवठा बंद.

संयुक्त महाराष्ट्र हाउसिंग सोसायटी परिसरातील पदपथची दुरवस्था.

अमृत योजनेतूून ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामापासून प्रभाग वंचित.

फोटो : २४०१२०२१ कोल राजारामपुरी प्रभाग न्यूज१

ओळी : कोल्हापुरात निवडणुकीच्या तोंडावर रस्ताची कामे सुरू झाली आहेत. राजारामपुरी एक्स्टेंशनमध्ये काही ठिकाणी खड्डी आणून ठेवली आहे. मात्र, रस्ताचे काम रखडले आहे.

फोटो : २४०१२०२१ कोल राजारामपुरी प्रभाग न्यूज २

ओळी : कोल्हापुरातील राजारामपुरी एक्स्टेंशन प्रभागात काही ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.

Web Title: Great 'Tashan' in Rajarampuri extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.