उदगांवमध्ये महसूल वाढीला मोठा वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:13+5:302021-07-21T04:18:13+5:30
शुभम गायकवाड उदगांव : शिरोळ तालुक्यातील मोठे महसुली गाव म्हणून ओळख असलेल्या उदगांवमधील करवसुली पाहता त्यावर गावचा गाडा चालविणे ...

उदगांवमध्ये महसूल वाढीला मोठा वाव
शुभम गायकवाड
उदगांव : शिरोळ तालुक्यातील मोठे महसुली गाव म्हणून ओळख असलेल्या उदगांवमधील करवसुली पाहता त्यावर गावचा गाडा चालविणे मुश्किलीचे बनले आहे. ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी व कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी करवसुलीचा सपाटा लावला होता. परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पूर्णत: करवसुली होऊ शकली नाही. एकंदरीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावासाठी महसुली धोरण ठरणे गरजेचे आहे.
उदगांव (ता. शिरोळ) हे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रहदारीचे गाव आहे. ग्रामपंचायतीचे १ कोटी ९२ लाख इतका महसूल थकीत होता. त्यापैकी अंदाजे १ कोटी करवसुली झाली आहे. परंतु उदगांव हद्दीत असणारे ल.क़अकिवाटे औद्योगिक वसाहतीने कारखान्यांची मोजणी झाल्याशिवाय कर भरणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याने विकास ठप्प झाला आहे. जर नवीन नियमाप्रमाणे कर आकारणी केली तर साधारणत: ५० लाख इतके उत्पन्न कारखान्यांकडून वाढू शकते. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी व इतर व्यवसाय कर यांचेही पुनर्नियोजन करणे अगत्याचे आहे. एकंदरीत ग्रामपंचायतीला महसूलच मिळत नसेल तर गाव चालवायचे कसे, असा प्रश्न पदाधिकारी व प्रशासनावर पडला आहे.
चौकट - विकासकामांवर चर्चा गरजेची
गावात विकासकामांऐवजी इतर गोष्टीवर मोठी चर्चा होताना दिसत आहे. तोच जोर जर विकासकामांवर व त्याच्या पाठपुराव्यावर करता आला तर मतदारांनी दिलेल्या सादाला विकासरुपी प्रतिसाद देता येईल. तसे काम ग्रा. पं. सदस्यांनी करणे गरजेचे आहे.
कोट - वसाहतीतील कारखान्यांची लवकरच मोजणी करण्यात येऊन गावाचा महसूल कसा वाढेल, यावर लक्ष देणार आहे. तसेच नागरिकांनी करवसुलीला सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यातूनच गावचा विकास साधता येईल.
- कलीमुन नदाफ, सरपंच