सरकी तेलाची उसळी; डाळीही वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:58 IST2018-03-05T00:58:42+5:302018-03-05T00:58:42+5:30

सरकी तेलाची उसळी; डाळीही वाढल्या
भाजीपाला स्थिर : डाळींच्या दरातही किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ
कोल्हापूर : सरकी तेलावर तब्बल १४ टक्के जादा कराची आकारणी सुरू केल्याने दराने चांगलीच उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ८२ रुपये दर राहिला असून किरकोळमध्ये तो ९० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गतआठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले आहेत. तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात मात्र थोडी वाढ झाली आहे.
शेंगतेलाचे दर पाहता सामान्य ग्राहक सरकी, पामतेल खरेदीकडेच अधिक वळतो. साधारणत: हे तेल सामान्यांच्या आवाक्यात असतात; पण सरकारने तेलावर तब्बल १४ टक्के करआकारणी सुरू केल्याने दर चांगलेच भडकले आहेत. सरकी तेलाने ८० रुपयांवरून ९० रुपयांपर्यंत उसळी घेतली असून सामान्य माणसाला चांगलाच चटका बसत आहे. हरभरा डाळ, तुरडाळीच्या दरात थोडी वाढ होत आहे. सरासरी किलोमागे दोन-तीन रुपयांची वाढ दिसत आहे. खोबरे, शाबू, साखरेच्या दरात फारशी चढ-उतार नाही.
भाजीपाल्याची आवक चांगली आहे, त्यात स्थानिक कोबी, फ्लॉवर, वांगी, दोडका, गवारची आवक सुरू असल्याने दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. कोबीचा गड्डा पाच रुपये तर वांगी वीस रुपये किलोपर्यंत आहेत. पालेभाज्यांची आवकही वाढली आहे. मेथी, पोकळा पेंढी पाच रुपये आहे. विविध फळांची रेलचेल वाढली असून चिकू, सफरचंद, द्राक्षांची आवक जास्त आहे. उन्हाचे चटके वाढल्याने कलिंगडाची मागणी वाढली आहे, आवकही चांगली असल्याने बाजारात कलिंगडेचे ढीग पाहावयास मिळत आहेत.
टोमॅटो तीन रुपयांपर्यंत!
टोमॅटोची आवक कमालीची वाढली आहे. बाजार समितीत रोज अडीच हजार कॅरेट आवक होते पण उठाव नसल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो तर किरकोळ बाजारात लालभडक टोमॅटोचा दर आठ रुपये किलो राहिला आहे.
हापूसची आवक सुरू : बाजार समितीत हापूस आंब्यांची आवक हळूहळू वाढत आहे. घाऊक बाजारात सरासरी ३२५० रुपये पेटी, तर ९०० रुपये बॉक्सचा दर आहे. पायरी आंब्याचा दर ५०० रुपये बॉक्स आहे.