चळवळ पुढे नेणे हीच ‘एनडीं’ना कृतज्ञता: पन्नालाल सुराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:10 IST2018-09-27T00:10:35+5:302018-09-27T00:10:39+5:30

चळवळ पुढे नेणे हीच ‘एनडीं’ना कृतज्ञता: पन्नालाल सुराणा
कोल्हापूर : आम्ही चळवळीतील शेवटची पिढी आहे, असे ऐकणे बरे वाटत नाही. चळवळ टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे. तरुणाईसह महिलांनी निर्धारपूर्वक चळवळीत सहभागी होऊन ती पुढे नेणे हीच ‘एन. डी.’ यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी बुधवारी येथे केले.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी ९० व्या वर्षात पर्दापण केल्याबद्दल राज्य आणि कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनतर्फे आयोजित ‘कृतज्ञता सोहळा’ मध्ये ते बोलत होते. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमधील कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुराणा यांच्या हस्ते मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर प्रमुख उपस्थित होते. सुराणा म्हणाले, शेतकरी आणि गरिबांच्या विविध प्रश्नांसाठी प्रा. पाटील यांनी अहिंसेच्या मार्गाने लढे दिले. त्यात यश मिळविले. ‘विचारवेध’, अंनिसच्या कार्याला बळ दिले. अनेक लढ्यात त्यांच्याबरोबर मला काम करता आले. त्यातून खूप काही शिकता आले. ‘एन. डी.’ यांचा समतेचा आग्रह आपण मनी बाळगणे, व्यवहारात आणणे आवश्यक आहे.