पडीक जमिनीवर बहरले उसाचे मळे
By Admin | Updated: July 23, 2014 23:31 IST2014-07-23T23:29:37+5:302014-07-23T23:31:06+5:30
कोलिक-गोठणेच्या शेतकऱ्यांना फायदा : ‘पाणलोट’च्या मजगी कामांचा यशस्वी प्रयोग

पडीक जमिनीवर बहरले उसाचे मळे
बाजारभोगाव : पन्हाळा कृषी खाते व पाणलोट समितीच्यावतीने केलेल्या मजगीच्या कामामुळे पडीक जमिनीमध्ये उसाचे मळे बहरू लागले. त्यामुळे कोलिक-गोठणे परिसरातील सामान्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.
डोंगर परिसरातील पडीक जमीन शेतीसाठी वापरण्यात यावी. बागायती क्षेत्र वाढावे, या उदात्त हेतूने शासनाने मजगीच्या कामे ‘पाणलोट’च्या माध्यमातून करण्याचे ठरविले. त्यानुसार पन्हाळा कृषी विभाग व पाणलोट समितीच्यावतीने गोठणे-कोलिक भागातील डोंगर परिसरात मजगीची कामे करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना परिस्थितीअभावी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम रखडले होते. अशा शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरली आहे. धनगर समाजातील लोकांनी मजगीची कामे केल्यानंतर उसाचे पीक घेतले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दगड-गोट्यांचा ढीग असणाऱ्या भागावर हिरवागार रंग चढला आहे.
मातीनाला बांधामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या चांगल्या मोहिमेला बळकटी मिळाली. बांधामध्ये पाणी साचत असल्याने जनावरांनाही चांगला उपयोग होऊ लागला आहे. योजना यशस्वी करण्याकामी तत्कालीन मंडल अधिकारी एस. आर. पाटील, अधिकारी बी. पी. शिंदे, भीमराव पाटील, ढवळे, पाणलोट अध्यक्ष, सचिव यांनी परिश्रम घेतले.
पाणलोटच्या माध्यमातून माझ्या पडसर खडकाळ जमिनीत मजगीची कामे झाल्याने मशागतीसाठी जमीन योग्य झाली. त्यामुळे ऊसपिकांतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग प्राप्त झाला.
- महादेव पाटील (शेतकरी), चाफेवाडी-गोठणे
पाणलोटच्या माध्यमातून परिसराचा कायापालट झाला. शासनाच्या निधीचा शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोग झाला. मजगीच्या कामामुळे पडीक असणारी डोंगरातील जमीन पिकाखाली आली.
- केदार पाटील, (पाणलोट अध्यक्ष)