आजी-माजी नगराध्यक्ष, आमदारांमध्ये कलगीतुरा
By Admin | Updated: March 9, 2015 01:09 IST2015-03-09T01:09:36+5:302015-03-09T01:09:54+5:30
इचलकरंजी नगरपरिषद : महिला आरक्षणाविषयी परस्परविरोधी टिप्पणी

आजी-माजी नगराध्यक्ष, आमदारांमध्ये कलगीतुरा
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजित जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आजी-माजी नगराध्यक्ष व आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या भाषणात मारलेल्या टोमण्याने कलगीतुरा रंगला. यावेळी महिला आरक्षणाचे स्वातंत्र्य आणि पालिकेतील बदललेल्या परिस्थितीनुरूप गटनेतेपदातील फरक या मुद्द्यांवर टीकाटिप्पणी झाली.
माजी नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांनी महिलांना मुक्तपणे पदाचा वापर करता येत नाही, असा मुद्दा मांडला. त्यानंतर आमदार हाळवणकरांनी गोंदकरांचा मुद्दा खोडून काढत नगराध्यक्ष शुभांगी बिरंजेंसारखे प्रसंगी बंड केले पाहिजे, असे सूचवित चौकार ठोकला. तर नगराध्यक्ष बिरंजे यांनी आमचे गटनेते म्हणून बाळासाहेब कलागते यांचा व विद्यमान गटनेते म्हणून अजित जाधव यांचा उल्लेख करीत षट्कार ठोकला.
नगराध्यक्ष बिरंजे या कॉँग्रेसच्या असूनही त्यांनी बंड केले आणि नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. त्यांच्या या बंडाला आमदार हाळवणकर यांच्या शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला. मात्र, नगराध्यक्षांवर अविश्वासदर्शक ठराव आणता येत नाही म्हणून विकासकामांचा दाखला देत कॉँग्रेसने नगराध्यक्ष बिरंजे यांना सहकार्य केले.
अशा पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी नगराध्यक्ष बिरंजे यांनी आयोजित केलेली विशेष सभा कॉँग्रेसच्याच नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने गणपूर्तीअभावी रद्द झाली. त्यामुळे नगरपालिकेत सर्व काही आलबेल आहे याबाबत पुन्हा शंका उपस्थित झाली. त्यापाठोपाठ श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात पालिका आयोजित महिला महोत्सवाच्या कार्यक्रमात आमदार हाळवणकर, माजी नगराध्यक्ष गोंदकर व नगराध्यक्ष बिरंजे बोलत होत्या. सुप्रिया गोंदकर यांनी महिलांना विविध स्वायत्त संस्थांच्या पदांसाठी आरक्षण मिळाले; पण पदावरील महिलेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही, असा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना आमदार हाळवणकर यांनी, सध्याच्या नगराध्यक्ष बिरंजे यांनी आपली निर्णय क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. त्यांनी बंडखोरी केली, याचा दाखला दिला. ते पुढे म्हणाले, पदावर असलेली महिला स्वतंत्र विचाराची व धाडसी असेल, तर तिला सर्व काही साध्य होते. (प्रतिनिधी)