आजीला आपुलकी... आजोबांना मान!

By Admin | Updated: January 1, 2015 00:09 IST2014-12-31T23:05:39+5:302015-01-01T00:09:24+5:30

साधू ज्येष्ठांशी संवाद : धकाधकीच्या जीवनात नात्यातील ओलावा होतोय कमी

Grandfather's affectionate ... grandfather! | आजीला आपुलकी... आजोबांना मान!

आजीला आपुलकी... आजोबांना मान!

सागर गुजर - सातारा  -ज्येष्ठांची हेळसांड हा मोठा प्रबंधाचा विषय ठरला आहे. एका ठरावीक वयानंतर आपण कुठल्या कामाचे राहिलो नाही, अशी भावना सतावणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना गरज असते ती कुणीतरी समजून घेण्याची! त्यांच्याशी कुणी संवाद साधला तरी फार झालं, ही त्यांची माफक इच्छा असते. मात्र, आजच्या धकाधकीत हा संवादच हरविल्याचं जाणवत राहतं. यातूनच नववर्षाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना समजून घेण्याचा संकल्प साताऱ्यातील जागृत तरुणांनी केला आहे.
समाजामध्ये अनेक विदारक अनुभव पाहायला मिळतात. आपल्या अवती-भोवती या घटना घडत असताना डोळेझाक करण्याची प्रवृत्तीच बळावताना पाहायला मिळते. साताऱ्यातल्याच एका कुटुंबाबाबतचा हा अनुभव! हे दाम्पत्य सरकारी नोकरीला होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी. मुले शिकत असताना दोघेही सकाळी १0 वाजता कामावर जाणार ते रात्रीच परत येणार. त्यातूनही मुलांना शिक्षण देण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत. थोरला मुलगा इंजिनिअर झाला. त्याला परदेशात नोकरी करण्याची ऊर्मी निर्माण झालेली. आई-वडील तोपर्यंत सरकारी नोकरीतून निवृत्तीच्या वाटेकडे झुकलेले. या इंजिनिअरने परदेशात जाऊन नोकरी करणार असल्याचे स्पष्टपणे आई-वडिलांना सांगितले. मुलाच्या स्वप्नांना मुरड घालायला नको म्हणून त्यांनीही त्याच्या इच्छेला बळच दिले. मुलगा दोन वर्षांपासून अमेरिकेत नोकरी करु लागला. एव्हाना मुलीलाही स्थळ बघून या दाम्पत्याने सासरी पाठविले. तिचेही सासर साताऱ्यापासून लांब असल्याने ती मनात असूनही आई-वडिलांना भेटू शकत नव्हती.
अमेरिकेत सेटल झालेल्या त्यांच्या इंजिनिअर मुलाने सुरुवातीला काही काळ आई-वडिलांशी संपर्क ठेवला; परंतु कालांतराने त्याचा संपर्क कमी होत गेला. काही दिवसांनी अमेरिकेतच एक मुलगी पाहून लग्न करण्याचा निर्णय घेतला. केवळ आई-वडिलांच्या कानावर असावे, या हेतूने त्याने फोन केला. शिक्षणानं सुसंस्कृतपणा येतोच असे नाही. मुलाला शिकवलं पण नात्यांमध्ये ओलेपणा टिकविण्याची त्याची इच्छाच मावळली. मावळतीच्या पंथावर पती-पत्नी एकमेकांना सावरुन घेत त्यांचा उत्तरार्धाचा प्रवास करीत आहेत. घरात काही काम करत असताना पाय घसरतो, तेव्हा मुलाची आठवण येते. तो दवाखान्यात नेईल, अशी इच्छा त्यांच्या मनात येते, पण मुलगा काही येत नाही. मुलाला फोन केला तर त्याचा फोनही लागत नाही.


वंशाला दिवा म्हणून एकाच मुलावर थांबलेल्या कुटुंबाचे अनुभवही काहीसे खेदजनक असे आहेत. आई-बाप मुलाला चांगले शिकवितात. मात्र, तो दोघांना सोडून जातो, त्याचे बस्तान बसते; पण आई-बाप वृध्दपणी होरपळत राहतात. यामध्ये वाईट इतकी परिस्थिती आहे की, एखादवेळेस दुर्दैवाने वृध्द पती-पत्नीपैकी एकजण देवाघरी गेल्यानंतर दुसऱ्याची पूर्णपणे वाताहत होत असते.


धकाधकीच्या व धावपळीच्या जगात कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस आल्याचे विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा श्रीमंत झाला म्हणून आपणंही त्यासाठी धडपडावं, अशी स्पर्धाच जणू लागली आहे. परदेशी राहणाऱ्यांना जसा देशाविषयीचे प्रेम कमी होते, तसेच त्याला नात्यांचे बंधही बेड्यांसारखे वाटत जातात. मरण हे सत्य आहे, हे ओळखून जरी नाती जपली तरी पुष्कळ होईल.
- विनोद कामटेकर


कुटुंबांतील गुंत्यांत नाती जपणारी भावनाच कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या निमित्ताने कुटुंबांतील स्नेहबंध टिकून राहावा, या हेतूने प्रत्येकानंच काम करायला हवंय, असं मला वाटतं. मुलांनी आपल्या पालकांना समजून घ्यावं आपणही केव्हा तरी म्हातारे होणार आहोत, हे सत्य दुर्लक्षून कसे चालेल? हा विचार मी माझ्या मित्रांपर्यंत पोहचविणार आहे.
- जुबेर शेख


खिसा भरलेला; हृदय रिकामे
आयुष्यभर राबून मिळविलेला हा पैसाही त्यांना आता कामाला येत नाही. पैसा असून काय करायचे? आपली माणसे कुठं आहेत? आपण केवळ यंत्र आहोत, या यंत्रातून मुलांना पैसे कमवून द्यायचे आणि यंत्र जुने झाले की त्याची निगाही रक्तातील माणसांना राखायला जमत नाही, अशी उद्विग्न भावना हे दाम्पत्य संवादावेळी व्यक्त करत असते. किंबहुना कुणीतरी आपल्याशी बोलायला यावं. आपण जिवंत आहोत तोवर तरी हा संवाद घडत राहावा, असं त्यांना मनोमन वाटत राहतं. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, यापेक्षाही वेगळे अनुभव प्रत्येकाला येत असतात.

Web Title: Grandfather's affectionate ... grandfather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.