जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घुमतोय ‘दादा’ आवाज

By Admin | Updated: October 12, 2014 23:32 IST2014-10-12T23:07:33+5:302014-10-12T23:32:04+5:30

विधानसभा निवडणूक : विजय कडणेंच्याच आवाजावर अनेक उमेदवारांच्या प्रचाराची भिस्त

'Grandfather' voice roaming around the corner of the district | जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घुमतोय ‘दादा’ आवाज

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घुमतोय ‘दादा’ आवाज

अविनाश कोळी - सांगली --ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला साद घालणारा एक भारदस्त आवाज... गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सांगलीच्या राजकारणाला वेड लावलेला... सत्तरीच्या उंबरठ्यावर असूनही अद्याप तारुण्यात असलेल्या या आवाजाशिवाय राजकीय सभा, समारंभ आणि प्रचाराचे कार्यक्रम पुढे जाऊच शकत नाहीत... यंदाच्या विधानसभेलाही या आवाजाने इतकी जादू केली आहे की, लढती बहुरंगी असल्या तरी, प्रत्येकाच्या प्रचारात हा एकच आवाज घुमत आहे.
लांबसडक कुर्ता... पायजमा... डोक्यावर गांधी टोपी आणि सोबतीला सायकल, अशा वेशभूषेतील विजयदादा कडणे यांच्या आवाजाचा महिमा आता सांगली जिल्ह्यासह राज्यभर पसरला आहे. नेता स्थानिक असो की राष्ट्रीय, समारंभ असो की प्रचार सभा, रिक्षातून प्रचार असो की लोकांसाठीची डॉक्युमेंटरी, प्रत्येक ठिकाणी दादांचा आवाज ठरलेला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दादांच्या या आवाजाने वेगळाच महिमा दाखवून दिला. प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांची एवढी गर्दी दिसत आहे. गर्दीतल्या बहुतांश उमेदवारांनी दादांचाच आवाज प्रचारासाठी वापरला आहे. एकाच चौकात प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या रिक्षा प्रचार करीत थांबल्यानंतर सर्व बाजूंनी एकच आवाज घुमत असल्याचे दिसून येत आहे. कमळाचा, हाताचा, धनुष्यबाणाचा, घड्याळाचा, नारळाचा आणि बऱ्याच चिन्हांचा प्रचार एकटे दादाच करीत आहेत.
दादांचे वय ६७ आहे. गेल्या ३५ ते ४0 वर्षांपासून निवेदक, कलाकार, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकांमधून ते लोकांसमोर येत आहेत. तरीही संपूर्ण जिल्ह्याला आणि राज्यातील नेत्यांना कडणेदादा आवाजामुळे परिचित आहेत. लोकांना खिळवून ठेवणे, त्यांचे मनोरंजन करणे, वातावरण निर्मिती करणे आणि त्यांच्यावर आपल्या आवाजाच्या माध्यमातून छाप पाडण्याचे काम कडणेदादा गेली अनेक वर्षे अविरतपणे करीत आहेत. त्यांच्या आवाजाशिवाय राजकारण्यांचा प्रचार किंवा कार्यक्रम आळणी वाटतो. जिल्ह्याच्या राजकारणाचे, इथल्या परंपरेचे आणि कडणेदादांच्या आवाजाचे घट्ट नाते आहे.

पाच-सहा तास स्टुडिओत
कडणेदादांच्या आवाजाला निवडणूक, उत्सव काळात अधिक मागणी असते. निवडणुकीत पाच ते सहा तास ते स्टुडिओत होते.
आवाजाबाबत सतर्कता
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या आवाजाची ढब, संवादातील चढ-उतार, त्यातील माधुर्य, जपलेले भाषासौंदर्य यात काहीही फरक पडलेला नाही. म्हणूनच दादांचे वय वाढले तरी, त्यांच्या आवाजाला चिरतारुण्याचे वरदान लाभल्याचे दिसून येते. हा आवाज तसाच रहावा, ऐन धामधुमीत तो खराब होऊ नये म्हणून कडणेदादा बाहेर खाण्याचे टाळतात.

कसरत सभांची
भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना किंवा अन्य पक्षांच्या कोणत्याही कार्यक्रमांना, प्रचार सभांना कडणेदादांनाच निमंत्रण दिले जाते. एकाचवेळी अनेक पक्षांची सभा असेल, तर त्यांची सायकलवरून सर्व कार्यक्रमांना आवाज देण्यासाठी कसरत सुरू असते. शिवसेनेची वातावरण निर्मिती केल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसच्या वातावरणात समरस होऊन बोलावे लागते. पक्ष बदलेल तशा भूमिका निवेदनाच्या माध्यमातून त्यांना बदलाव्या लागतात. शहरभर ते सायकलवरून फिरतात. जिल्ह्यात अन्य ठिकाणी सभा असेल, तर एसटीतून त्यांचा प्रवास सुरू असतो.

Web Title: 'Grandfather' voice roaming around the corner of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.