दादा, गाठ बळिराजाशी...
By Admin | Updated: October 17, 2015 00:18 IST2015-10-17T00:17:10+5:302015-10-17T00:18:37+5:30
राजू शेट्टींचा सहकारमंत्र्यांना इशारा : शरद पवार गुरू नव्हे ‘भस्मासूर’ : सदाभाऊंचा हल्ला

दादा, गाठ बळिराजाशी...
कोल्हापूर : ‘एफआरपी’ कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभ्यास करून बोलावे. आमच्या वाट्याला येऊ नका; अन्यथा गाठ बळिराजाशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.‘स्वाभिमानी’च्यावतीने शुक्रवारी एकरकमी ‘एफआरपी’साठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट इशारा मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये खासदार शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
खासदार शेट्टी म्हणाले, एकरकमी ‘एफआरपी’बाबत सहकारमंत्र्यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, अभ्यास करून बोलावे. सल्ला अनेकजण देतात, त्यामुळे नीट ऐकून बोला; अन्यथा घोटाळा होईल. तोंडाला येईल ते बोलू नका, गाठ बळिराजाशी आहे. राजू शेट्टी विष्णूचा अवतार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देण्याचे काम त्यांनी करावे, असे सहकारमंत्री म्हणत आहेत, या वाक्याचा खरपूस समाचार घेत, मला विष्णू किंवा राक्षस म्हणा; पण दादा, शेतकऱ्यांच्या वाट्याला जाऊ नका; अन्यथा मला राक्षसासारखे वागावे लागेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
‘राजारामबापू’ने ‘एफआरपी’मधून १४३ रुपये, ‘छत्रपती-पुणे’ने १०० रुपये, ‘मोहनराव शिंदे’ने १४३ रुपये, ‘हुतात्मा’ने १०० रुपये कपात केली आहे. शेतकऱ्यांची सहमती न घेताच ही बेकायदेशीर कपात केली आहे. साखर जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्याने ‘एफआरपी’शी छेडछाड केल्याने संबंधितांवर फौजदारी दाखल करा. तसेच संबंधित बॅँकांच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर थेट हल्ला चढवत सदाभाऊ खोत म्हणाले, आमचे सहकारमंत्री हे शरद पवार यांना आपले गुरू मानत आहेत. दादा, पवार गुरू नव्हेत, तर ‘भस्मासूर’ आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे तुमचे गुरू कसे होऊ शकतात? दादा, साखरसम्राटांना वटणीवर आणण्यासाठी राजू शेट्टींच्या हातात काठी द्या.
मुख्यमंत्री ऐकत नाही म्हटल्यावर शरद पवार यांनी लॉबिंग सुरू केले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आहे. दादा, पवार साहेबांच्या नादाला लागून शेतकऱ्यांना अंगावर घेऊ नका. आम्ही अनेकांचे जळण केले, याचे भान ठेवा, असा इशारा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. तुमच्या खुर्चीला धक्का लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ंस्वाभिमानीचा मोर्चा : राष्ट्रवादी दिसणार नाही
सोसायटीमधील लाख-दोन लाखांच्या घोटाळ्याबद्दल सहा महिने तुरुंगात जावे लागते; पण कोल्हापूर जिल्हा बॅँकेत दोनशे कोटींचा घोटाळा करणारे मोकाट सुटले आहेत. जिल्हा बॅँकेची चौकशी लावा. त्यांच्या बोलत्या बंद होतील. साखर कारखान्यांची विक्री कोणी केली, कोणी खरेदी केली, याची चौकशी केली, तर राष्ट्रवादीचे कसपटही राज्यात दिसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.