आजऱ्याचे ग्रामदैवत वाहनांच्या गराड्यात
By Admin | Updated: November 26, 2014 00:06 IST2014-11-25T21:54:55+5:302014-11-26T00:06:53+5:30
देवस्थानचा विरोध : कुंभार पे अँड पार्ककरिता अडचण

आजऱ्याचे ग्रामदैवत वाहनांच्या गराड्यात
ज्योतीप्रसाद सावंत -आजरा आजऱ्याचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर परिसर म्हणजे खासगी वाहनांचा पार्किंग तळ बनला असून, देवस्थान कमिटीने यामध्ये लक्ष घालून वाहन पार्किंगबंद करून येथे पार्किंग बंदीसाठी बोर्ड लावण्याची मागणी होत आहे. आजऱ्याचे ग्रामदैवत रवळनाथाचे शहरात भरवस्तीत मंदिर आहे. मुळातच मुख्य मंदिराची इमारत वगळता येथे शिल्लक राहणारी जागा ही अत्यंत कमी आहे. मुख्य मंदिराच्या एका बाजूला गणपती मंदिर व असणारी रिकामी जागा फाटक लावून बंद ठेवली जाते.परिणामी मंदिराच्या मागील बाजूने समोर जाण्याकरिता एकमेव मार्ग शिल्लक राहतो. या मार्गावर पादचारी व भक्तमंडळींची नेहमीच वर्दळ असते. मात्र, या मार्गावर खासगी गाड्या पार्किंग केल्या जातात. मंदिराच्या शेजारी दुचाकी, तर मंदिराच्या मागील बाजूस चारचाकी वाहने उभी केली जातात.
विशेषत: शुुक्रवारी आठवडा बाजारादिवशी येथून बाजारहाटसाठी जाणाऱ्या महिलांना वाट काढताना बरीच कसरत करावी लागते. गाड्या बाजूला घेणारे व गाड्या लावणारे यांची येथे गर्दी दिसते. मुळातच हा रस्ता अरुंद व त्यातच येथे उभी केलेली वाहने यामुळे येथे प्रचंड अडचण होते. देवस्थान कमिटीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
देवस्थानचा विरोध : कुंभार
मंदिराचे पावित्र्य लक्षात घेता हा परिसर स्वच्छ व रिकामा असणे गरजेचे आहे. येथे गाड्या पार्किंगकरिता देवस्थान समितीचा विरोधच आहे. ग्रामपंचायत व पोलीस खात्याने वाहनधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी प्रतिक्रिया देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंदा कुंभार यांनी दिली.
पे अँड पार्ककरिता अडचण
पे अँड पार्क पद्धत अवलंबायची तर वसुलीकरिता ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार भागवायचा कुणी? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे.