अकरा सदस्यांसह ग्रामसेवक दोषी
By Admin | Updated: April 7, 2015 01:12 IST2015-04-07T01:01:37+5:302015-04-07T01:12:58+5:30
टाकवडे ग्रामपंचायत : पंचायत समितीच्या निधीचा दुरुपयोग प्रकरण

अकरा सदस्यांसह ग्रामसेवक दोषी
कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे पंचायत समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी शिरोळचे गटविकास अधिकारी उदय कुसूरकर यांनी पत्रान्वये ग्रामपंचायतीला दोषी ठरविण्यात आले आहे. रस्त्याच्या कामाच्या ठरावाला मंजुरी देणाऱ्या अकरा सदस्यांसह ग्रामसेवकाला दोषी ठरवल्याने रस्त्याच्या खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. शेतकरी रमजान मियालाल बारगीर यांनी तक्रार केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
येथील पाटील मळ्याकडे जाणाऱ्या गट नं. १०३३ मधून भाऊसो नुलेपाटील ते सतीश शेवाळे घर असा ५०० मीटरचा रस्ता पंचायत समिती सदस्य मंगला कांबळे यांच्या निधीतून १ लाख रुपये खर्चून रस्त्याचे मुरुमीकरण केले आहे. कोणत्याही रस्त्यावर शासकीय निधी खर्च करताना रस्ता शासनदप्तरी नोंद होणे गरजेचे असते. तसेच नोंद करताना संबंधित सर्व शेतकऱ्यांची लेखी संमती घेणे आवश्यक असते.
या रस्त्यावर सुमारे २५ ते ३० शेतकरी आहेत. २९ एप्रिल २०१४ रोजी ग्रामपंचायतीमध्ये रस्त्याचा ठराव करून नोंद करण्यात आली. संमतीपत्रामध्ये थोड्याच शेतकऱ्यांचा समावेश आहे. रस्ता नोंद करून या रस्त्यावर निधी खर्च करण्यासाठी २७ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ठराव करून रस्ताही पूर्ण केला. संबंधित ठेकेदाराने कामाचे संपूर्ण बिलही उचल केले आहे.
रस्ता माझ्या शेतातून असून शासकीय निधी कसा खर्च केला, असा प्रश्न उपस्थित करून रमजान मियालाल बारगीर यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्याने चौकशी केली असता ग्रामपंचायतीकडून त्रुटी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे गटविकास अधिकारी कुसूरकर यांनी रस्त्याची नोंद घेताना दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची लेखी सहमती घेणे आवश्यक होते, परंतु ती घेतली गेली नाही. रस्त्याची तात्पुरती नोंद घेतली आहे. तात्पुरती नोंद घेण्याची कार्यप्रणाली ग्रामपंचायत अधिकारात नाही. रस्त्याबाबत ग्रामपंचायत टाकवडे यांना जबाबदार धरण्यात येत असल्याचा ठपका ठेवला असल्याचा निर्णय लेखी पत्रातून कळविला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सरपंच भारती कांबळे यांच्यासह अकरा सदस्य व ग्रामसेवक ए. आर. मुल्ला यांना दोषी ठरविले. निर्णयावर ग्रामपंचायत कोणता निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूल
रस्त्याच्या कामासाठी २७ आॅगस्ट २०१४ रोजी ठराव करुन तो मंजूर केला. यावेळी सरपंच भारती सुरेंद्र कांबळे, उपसरपंच - अमोल श्रीपाल चौगुले, सदस्य सर्वश्री शेखर आण्णासो पाटील, अविनाश बाळासो कांबळे, उदय सखाराम झुटाळ, दावल मुबारक शेख, संजयकुमार जिनपाल पडियार, कविता संजय निर्मळ, मेहराजबी अल्लाउद्दीन मुल्ला, लता सतगोंडा पाटील, अनिता चंद्रकांत कोळी, ग्रामसेवक ए. आर. मुल्ला उपस्थित होते. त्यांच्याकडून रस्त्याच्या खर्चाची रक्कम दंडात्मक स्वरुपात वसूल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.