घरभाडे भत्ता मिळूनही ग्रामसेवक ग्रामपंचायत मुख्यालयात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:06+5:302021-06-20T04:17:06+5:30

दत्ता बिडकर, हातकणंगले : ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा तत्काळ निपटारा व्हावा यासाठी ग्रामसेवकांना मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे, यासाठी ...

The Gram Sevak is not at the Gram Panchayat headquarters even after getting the rent allowance | घरभाडे भत्ता मिळूनही ग्रामसेवक ग्रामपंचायत मुख्यालयात नाही

घरभाडे भत्ता मिळूनही ग्रामसेवक ग्रामपंचायत मुख्यालयात नाही

दत्ता बिडकर,

हातकणंगले : ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा तत्काळ निपटारा व्हावा यासाठी ग्रामसेवकांना मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे, यासाठी शासन घरभाडे भत्ता देते. ग्रामसेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे, असा शासन निर्णय आहे. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींमधील एकही ग्रामसेवक मुख्य सज्जाच्या ठिकाणी राहत नाही, मग गावे कोविडमुक्त कशी होणार, हा गावासमोरील प्रश्न आहे.

ग्रामसेवकच शासन निर्णय बासनात गुंडाळत असतील तर त्यांच्यावर निर्बंध कोण लावणार. हातकणंगले तालुका अडीच ब्लॉकचा आहे. विस्ताराने कमी आणि लोकवस्तीने दाट आहे. यामुळे तालुक्यात दोन हजारांपासून चाळीस-पन्नास हजार लोकवस्तीची गावे आहेत. नागरी सुविधांची प्रत्येक गावामध्ये वानवा आहे. गावपातळीवर ग्रामसेवक हाच त्या गावचा प्रमुख असून त्याच्याशिवाय कोणतेही काम होत नाही. हातकणंगले तालुक्यामध्ये ६० ग्रामपंचायती आहेत. ग्रामसेवकांची संख्या ४९ इतकी आहे. १० जागा रिक्त आहेत. तर १० ग्रामसेवकांकडे दोन-दोन ग्रामपंचायतींचा प्रभारी चार्ज असल्याने ग्रामस्थांची कामेही वेळेत होत नाहीत.

ग्रामसेवक हा गावचा कणा असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीशिवाय कोणतेही काम पुढे सरकत नाही. म्हणूनच शासनाने शासन निर्णय काढून ग्रामसेवकांनी गावामध्येच रहावे, असा निर्णय घेतला. यासाठी ग्रामसेवकांना मूळ वेतनाच्या १० टक्के घरभाडे भत्ता शासनाकडून प्रत्येक महिन्याच्या पगारामध्ये मिळतो. याशिवाय तालुका, जिल्हा पातळीवर त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडे कामानिमित्त जाण्यासाठी, ग्रामपंचायतीच्या सोयीसुविधा खरेदी करण्यासाठी फिरती भत्ता वेगळाच दिला जातो. तरीही ग्रामसेवकांची गावामध्ये उपस्थिती मात्र नाममात्रच असते.

शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचा आदेश बासनात गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या ठिकाणी एकही ग्रामसेवक राहत नसल्याचे अहवाल वरिष्ठांकडे असूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य नेहमी ग्रामसेवकांच्या गैरहजेरीबाबत वरिष्ठांकडे दाद मागूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नेहमी ग्रामसेवकांची पाठराखण पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाकडून केली जाते.

कोरोनाच्या महामारीमध्ये ग्रामपंचायतींनी ३० बेडची कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे शासनाने सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गावामध्ये स्पिकर लावून रिक्षा फिरवणे, त्यावर दवंडीवजा सूचना देणे, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, प्राथमिक शिक्षक यांना कामाला जुपणे एवढी भूमिका ग्रामसेवक पार पाडत असल्याचे चित्र गावागावांमध्ये आहे.

कोट

तालुक्याला ३७ ग्रामविकास अधिकारी मंजूर आहेत. प्रत्यक्ष २६ हजर आहेत. तर ११ रिक्त आहेत. सर्व ५० हजर ग्रामसेवकांनी आमच्याकडे ग्रामपंचायत सज्जाच्या ठिकाणी राहत असल्याचे भाडेकरार दिले आहेत. त्यामुळे कोण कोठे राहतो याबाबत बोलण्यास नकार दिला.

- संतोष पवार, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती हातकणंगले

Web Title: The Gram Sevak is not at the Gram Panchayat headquarters even after getting the rent allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.