आरे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागा असून, महापुरात सारे गाव एकत्र आल्याने हीच एकी पुढे राहावी, म्हणून निवडणूक बिनविरोध करण्यात आली. परंतु, इच्छुकांची संख्या वाढल्याने आणि भावकीला संधी द्यावी लागल्याने तीन सदस्यांनी अडीच वर्षानंतर राजीनामे देण्याचा व तिथे इतरांना संधी देऊन त्यावेळीही बिनविरोध सदस्य निवड करण्याच्या प्रस्तावाला सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी संमती दर्शवली व त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
लढायला मागे परंतु बिनविरोधला पुढे
निवडणूक लागली आणि गटासाठी किंवा पक्षासाठी तुम्हांला लढायला लागतंय म्हटलं तर अनेकजण पाय मागे ओढतात. यंदा पोरीचे लग्न करायचे म्हणतोय, घर बांधणार आहे, खर्चाची बाजू आहे अशी कारणे सांगून लढायला नकार दिला जातो. परंतु, बिनविरोध होत आहे म्हटल्यावर मात्र गटतट, पार्टी, भावकी, जातीपासून गल्लीपर्यंतच्या अस्मितांना धुमारे फुटले. त्यामुळेही अगदी बिनविरोध होत असलेल्या ग्रामपंचायतीतही निवडणूक लागली आहे.
तरुणाईचा आग्रह निवडणुकीसाठी
अनेक गावांमध्ये जुने-जाणते कार्यकर्ते निवडणूक बिनविरोध करावी, असा आग्रह धरत होते. परंतु, तरुण कार्यकर्ते मात्र निवडणूक बिनविरोध करण्यास तयार नव्हते. काय खर्च व्हायचा तो होऊ दे परंतु निवडणूक लढवायचीच, असा त्यांचा अट्टाहास होता. त्यातून तडजोडीला बसल्यावर गावात फारसे पाठबळ नसतानाही मग अवास्तव जागा मागणी झाली. त्यामुळे बिनविरोधला खोडा बसला.