धान्याची आवक स्थिर; मात्र दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:37+5:302021-05-09T04:25:37+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर बाजार समितीकडे धान्याची आवक स्थिर आहे; मात्र दरात काहीसी घसरण झालेली ...

धान्याची आवक स्थिर; मात्र दरात घसरण
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर बाजार समितीकडे धान्याची आवक स्थिर आहे; मात्र दरात काहीसी घसरण झालेली दिसते. कोल्हापुरात रोज ८१० टन धान्याची आवक होते; मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे बाजारपेठ काहीसी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम उठावावर दिसत आहे.
खरिपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खरीप ज्वारी, मक्यासह कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कोल्हापुरात बारमाही धान्य व कडधान्याची आवक मोठ्या प्रमाणात असते. कोल्हापुरात रोज ७५० टन धान्याची आवक होते. सध्या आवक स्थिर आहे; मात्र दरात काहीसी घसरण दिसते. तूर डाळ ११० रुपयांवरून १०० रुपयांवर तर हरभरा डाळ ७० रुपयांवरून ६५ रुपयांवर आली आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, शाळूचे दरही थोडे कमी झाले आहेत. मालाची आवक स्थिर आणि उठाव नसल्याने दरावर परिणाम झाला आहे.
पावसाच्या बेगमीसाठी हात आखडता
साधारणत: पावसाळ्यापूर्वी धान्य, कडधान्य, तेलाची बेगमी करून ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्याची खरेदी एप्रिल, मे महिन्यात होत असल्याने धान्य बाजारातील उलाढाल या दोन महिन्यात अधिक असते; मात्र यंदा एप्रिल, मे मध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत धान्याचा उठाव झाला नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
मोफत धान्य वाटपाचाही परिणाम
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारने रेशनवर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. धान्याची मागणी कमी होण्यात हे एक कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
व्यापारी म्हणतात....
धान्य व कडधान्याची आवक चांगली आहे; मात्र लॉकडाऊनसह एकूणच कोरोनाच्या परिस्थितीमुळे ग्राहक कमी असल्याने मालाचा अपेक्षित उठाव होत नाही.
- वैभव सावर्डेकर (कडधान्य व्यापारी)
शेतकरी म्हणतात...
यंदा भाताच्या दरात मोठी घसरण झाली. हजार रुपये क्विंटलने भाताची विक्री करण्याची वेळ आली. त्यातून उत्पादन खर्चही निघाला नाही.
- नाथा नांगरे (शेतकरी, सरूड)
रोज होणारी आवक टनात
धान्य आवक घाऊक दर, किलो
ज्वारी १०० २२ ते २७
तांदूळ २४० ३० ते ५० ( जाडा २० रूपये)
गहू २६० २३ ते ३०
डाळी १६० तूर डाळ -१००, हरभरा डाळ -६५