महाविद्यालयांचे वाढीव शुल्क रद्द
By Admin | Updated: July 31, 2014 00:51 IST2014-07-31T00:49:46+5:302014-07-31T00:51:37+5:30
इचलकरंजी : ‘एनएसयुआय’ची माहिती; दीड हजार विद्यार्थ्यांना लाभ

महाविद्यालयांचे वाढीव शुल्क रद्द
इचलकरंजी : ‘एनएसयुआय’ विद्यार्थी संघटना व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी महाविद्यालयीन वाढीव शैक्षणिक शुल्काबद्दल शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाढीव शुल्काचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आणून दिल्यामुळे बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी असणारे शुल्क १८ हजार रुपयांनी, बी.कॉम व बी.ए. साठीचे शुल्क पाच ते सात हजार रुपयांनी कमी झाले. याचा लाभ शहरातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती ‘एनएसयुआय’च्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
येथील ‘एनएसयुआय’ या विद्यार्थी संघटनेने शुल्क वाढीच्या विरोधात ‘डीकेएएससी’ महाविद्यालयावर आंदोलन केले होते. तसेच शुल्क वाढ कमी करावी, असे निवेदनही दिले होते; पण ही शुल्क वाढ रद्द व्हावी म्हणून ‘एनएसयुआय’चे एक शिष्टमंडळ माजी मंत्री आवाडे यांना भेटले. त्यांनी शिक्षण राज्यमंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर संपर्क साधला व त्यांच्याशी चर्चा केली. टोपे यांनी वाढीव फीबाबत तत्काळ निर्णय घेऊन संबंधितांना सूचना देण्याची ग्वाही दिली.
तसेच विद्यापीठाचे संचालक ए. बी. राजगे यांच्याशीसुद्धा आवाडे यांनी चर्चा केली. त्यानंतर प्राचार्य मिलिंद हुजरे यांच्याबरोबर दूरध्वनीवरून बोलणे झाले. त्यावेळी पूर्वीप्रमाणे शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे शुल्क वाढ कमी झाली. विना अनुदानित तुकड्यांसाठी बी.एस्सी. विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी ७५०० रुपये, द्वितीय वर्षासाठी दहा हजार रुपये, तर तृतीय वर्षासाठी १२,५०० रुपये असे शुल्क आकारण्यात येणार होते. त्याऐवजी आता अनुक्रमे २५००, तीन हजार व चार रुपये अशी शुल्क आकारणी होणार आहे. ‘एनएसयुआय’च्या शिष्टमंडळामध्ये नगरसेवक सुनील पाटील, शिक्षण मंडळाचे सदस्य शेखर हळदकर, विनोद कांबळे, अनिकेत चव्हाण, आनंद भोसले, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)