शासनाच्या कृपेने धामणी खोरे तहानलेलेच
By Admin | Updated: December 28, 2014 21:42 IST2014-12-28T21:42:47+5:302014-12-28T21:42:47+5:30
निधीविना काम बंद : चौदा वर्षांपासून प्रकल्प रखडला, खोऱ्यात आजही पाणीटंचाई कायम

शासनाच्या कृपेने धामणी खोरे तहानलेलेच
महेश आठल्ये -म्हासुर्ली -तीन तालुक्यांत विभागलेल्या धामणी खोऱ्यास हरितक्रांतीची स्वप्ने दाखविणाऱ्या धामणी प्रकल्पाचे काम गेली चार वर्षे बंद आहे. प्रकल्पाच्या कामास सुरुवात होऊन १४ वर्षे झाली; पण वेगवेगळ्या कारणांनी काम रखडलेलेच आहे. त्यामुळे धामणी खोऱ्याच्या पाचविला पूजलेली पाणीटंचाई आजही कायम आहे.
५०-६० वाड्या, वस्त्या आणि गावांनी वसलेला, मुबलक पर्जन्यवृष्टी होणारा, सुपीक भूसंपदा असणाऱ्या धामणी खोऱ्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. यावर उपाय म्हणून येथील बळिराजा धामणी नदीवर मातीचे बंधारे स्वखर्च व श्रमदानाने वर्षानुवर्षे बांधून पाणी अडवतो. स्वयंशिस्तीने पुरवून, वापरून आपली शेती जगवतो. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे या खोऱ्यास मागासलेपण आले. परिणामी, गरिबी, बेकारी, व्यसनाधीनता आहे. येथील भूमिपुत्र मोलमजुरी, गुऱ्हाळघर, सेंट्रिंग, लाकूडतोड, आदी कामे करून आपला उदरनिर्वाह चालवितो. या खोऱ्यात एकही पाणी साठविण्याचा प्रकल्प नसल्याने या परिसरातून प्रकल्पाची मागणी होऊ लागली आहे. मात्र, मागासलेपणाचा फायदा घेऊन सरकारदरबारी या मागणीस केराची टोपली दाखविल्याने आबा कांबळे, भारत पाटणकर, प्रा. टी. एल. पाटील, संपतराव पोवार-पाटील, आदींच्या नेतृत्वाखाली गुरे-ढोरे, मुले-बाळांसह आंदोलन केल्यावर युती शासनाच्या काळात ३.८५ टीएमसी क्षमतेच्या प्रकल्पास १९९६ साली राही (ता. राधानगरी) येथे मंजुरी मिळाली. सन २००० मध्ये तत्कालीन मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि काम सुरूही झाले. सुरुवातीपासूनच वनविभागाची आडकाठी, निधीची कमतरता, आदींमुळे अनेकवेळा काम बंद राहिले.
युती शासनाकडून अपेक्षा
सध्या राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. जिल्ह्यातून दहापैकी आठ आमदार युतीचे आहेत. ‘धामणी’चे प्रतिनिधित्व करणारे आमदारही शिवसेनेचे आमदार आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठा रखडलेला हा प्रकल्प असून, या सर्व आमदारांनी सरकार दरबारी आपले वजन वापरून खास बाब म्हणून या प्रकल्पास नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी या खोऱ्यातून होत आहे.
हा प्रकल्प सध्या ८०० कोटींवर गेला असून, निधी नसल्याने गेली चार
वर्षे काम पूर्णपणे बंद झाले. दरवर्षी प्रकल्पाच्या खर्चाचा आकडा वाढत आहे. परिणामी, मातीचे बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम आजही
सुरू आहे.