राज्यकर्त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
By Admin | Updated: February 25, 2015 00:07 IST2015-02-24T23:50:00+5:302015-02-25T00:07:05+5:30
कवाडे : अधिवेशनादरम्यान जाब विचारू

राज्यकर्त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
कोल्हापूर : डॉ़ नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढेपर्यंत राज्यकर्त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा़ जोगेंद्र कवाडे यांनी केली़ प्रा़ कवाडे यांनी मंगळवारी पानसरेंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले़ त्यानंतर कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ प्रा़ कवाडे म्हणाले, महात्मा गांधी, डॉ़ नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी धर्मांध प्रवृत्तींनी एक समान सूत्र वापरले आहे़ या प्रवृत्तीचे रखवालदार सत्तेत आहेत़ खुन्यांच्या पापांवर पांघरूण घातले जात असून महाराष्ट्राचे पुरोगामी आणि प्रतिगामी असे विभाजन करण्याचे षङ्यंत्र सुरू आहे़ ते रोखण्यासाठी पुरोगामी संघटनांनी प्रतिगामी संघटनांना सडेतोड उत्तर द्यावे़पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने महाराष्ट्रभरात आंदोलन करण्यात येत आहे़ ९ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शासनाला पानसरेंच्या हत्येचा जाब विचारणार आहे़ पानसरेंच्या हत्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत ‘जंतर-मंतर’वर २५ मार्चला आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहितीही कवाडे यांनी दिली़
याप्रसंगी पानसरेंना श्रद्धांजली वाहण्यात आली़ यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नंदकुमार गोंधळी, जिल्हाध्यक्ष डी़ जी़ भास्कर, शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव, विद्याधर कांबळे, प्रकाश अंगरखे, सुरेश सावर्डेकर, लता नागावकर, अस्मिता दिघे, माधुरी कांबळे उपस्थित होेते.