नेतेमंडळी घेणार आता सत्ताधारी संचालकांची हजेरी
By Admin | Updated: July 17, 2015 01:07 IST2015-07-17T01:07:00+5:302015-07-17T01:07:12+5:30
पुढील कारभार चांगला व पारदर्शी करण्यासाठी तसेच शेतकरीभिमुख निर्णय होण्यासाठी आघाडीचे नेते संचालक मंडळाला सोबत घेऊन आढावा घेणार

नेतेमंडळी घेणार आता सत्ताधारी संचालकांची हजेरी
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर विजयाचा झेंडा फडकाविणाऱ्या राष्ट्रवादी-जनसुराज्य-शेकाप आघाडीच्या नेत्यांनी समितीचा कारभार चांगला राहण्यासाठी दोन महिन्यांतून एकदा संचालकांसमवेत बैठक घेऊन आढावा घेण्याचे नियोजन केले आहे. सभापतिपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी आघाडीचे नेते एकत्र बसून सर्वसंमतीनेच निर्णय घेणार आहेत यासंदर्भात लवकरच बैठक होईल.बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी-जनसुराज्य शक्ती-शेकापक्षाची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी, काँग्रेसची राजर्षी शाहू आघाडी व शिवसेना-भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिव-शाहू परिवर्तन आघाडी उतरली होती. तीन पक्षीय पॅनेलमुळे प्रचंड चुरस निर्माण झाली होती. विरोधकांकडून राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच प्रशासक आणण्याची वेळ आल्याचीही टीका झाली. या आरोपानंतरही राष्ट्रवादीने १९ पैकी १५ जागा जिंकत मैदान मारले तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपांची सल राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना अजूनही बोचत आहे.त्यामुळे त्यामुळे इथून पुढील कारभार चांगला व पारदर्शी करण्यासाठी तसेच शेतकरीभिमुख निर्णय होण्यासाठी आघाडीचे नेते संचालक मंडळाला सोबत घेऊन आढावा घेणार आहेत. दर दोन महिन्याला ही बैठक घेतली जाईल.
बाजार समिती सभापतिपद कोणाकडे यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती, शेकापक्ष, माजी मंत्री सतेज पाटील गट, समरजितसिंह घाटगे गट यांचे नेते एकत्र बसून सर्वानुमते व सर्वसंमतीने निर्णय घेणार आहेत. लवकरच याबाबत बैठक होऊन निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. (प्रतिनिधी)