शासनाने साखर उद्योग वाचवावा
By Admin | Updated: April 4, 2015 00:15 IST2015-04-03T21:11:30+5:302015-04-04T00:15:07+5:30
चंद्रदीप नरके : ‘कुंभी-कासारी’च्या ५२व्या गळीत हंगामाची सांगता

शासनाने साखर उद्योग वाचवावा
कोपार्डे : साखरेचे दर दिवसेंदिवस गडगडत असल्याने संपूर्ण साखर कारखानदारीच आर्थिक अरिष्टात सापडली आहे. या उद्योगाला सावरण्याची शासनाची संपूर्ण जबाबदारी असून, ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर पुढील हंगामात साखर कारखाने सुरूच होणार नाहीत, अशी भीती कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली.
‘कुंभी-कासारी’चा ५२ वा गळीत हंगाम नुकताच झाला. या हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे संचालक बळवंत पाटील (वरणगे पाडळी) व त्यांच्या सुविद्य पत्नी लीलाताई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. चंद्रदीप नरके म्हणाले, या हंगामात कुंभी कारखान्याने १३६ दिवसांत १३.०१ च्या सरासरी उताऱ्याने सहा लाख २० हजार ९०८ मे. टन उसाचे गाळप केले असून, आठ लाख नऊ हजार ३४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, गेले पाच दिवस कुंभी-कासारी बचाव मंचच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बचाव मंचच्या ठिय्या आंदोलनाला आ. नरके यांनी सर्व संचालकांसमवेत भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आ. नरके यांनी शासनाची येत्या मंगळवारी मदतीची कोणती भूमिका होणार यावरच सर्व अवलंबून असल्याचे सांगत, आपण जाहीर केलेला २६४० रुपये दर देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगतिले. मात्र, बचाव मंचने ही भूमिका अमान्य करून ठिय्या आंदोलन पुढे सुरू ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला.