अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमा
By Admin | Updated: July 11, 2017 18:51 IST2017-07-11T18:51:53+5:302017-07-11T18:51:53+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव; ‘अंबाबाई एक्सप्रेस’ नामकरणाची मागणी

अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : येथील अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमावेत, असा ठराव कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे. ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती’ने असा ठराव करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांना निवेदन दिले होते.
भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांनी सभा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच हा ठराव मांडला. सर्वांची आराध्य देवता असलेल्या श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये पंढरपूरच्या धर्तीवर सरकारी पुजारी नेमावेत, अंबाबाईच्या पेहरावाबाबत भविष्यात चूक होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना ठराव पाठविणे आणि कोल्हापूर-मुंबईदरम्यान धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचे ‘श्री अंबाबाई एक्सप्रेस’ असे नामकरण करणे, असे तीन ठराव यावेळी इंगवले यांनी मांडले.
या मांडलेल्या ठरावांना टाळ्यांच्या गजरात उभे राहून, हात उंचावून मान्यता देण्यात आली. यानंतर ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. गेले महिनाभर कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या पुजाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू असून, या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात संघर्ष समितीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची भेट घेऊन अशा पद्धतीने ठराव करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच हे तीन ठराव करण्यात आले.