शासनाच्या धोरणाने नाराजी : लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आल्याचा सूर

By Admin | Updated: November 25, 2015 00:32 IST2015-11-25T00:29:51+5:302015-11-25T00:32:22+5:30

नगरसेवकांना बगल देऊन इचलकरंजीतील विकासकामे

Government policy resentment: the verdict on the claim of people's representatives | शासनाच्या धोरणाने नाराजी : लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आल्याचा सूर

शासनाच्या धोरणाने नाराजी : लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आल्याचा सूर

इचलकरंजी : कृष्णा नळ पाणी योजनेकडील दाबनलिका बदलण्यासाठी २७ कोटी रुपये आणि शहराच्या बाह्यवळण मार्गासह प्रमुख रस्त्यांच्या मजबुती-डांबरीकरणासाठी मिळणारे २५ कोटी रुपये असा निधी शासनाच्या जीवन प्राधिकरण व बांधकाम खात्याकडून थेट खर्च होणार असल्याने नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे पालिकेकडील लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा येत असल्याची नगरपालिकेत जोरदार चर्चा आहे.
साधारणत: अठरा वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या कृष्णा नळ पाणी योजनेला मजरेवाडी येथील कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्यात येतो. तेथून इचलकरंजीपर्यंत १८.५ किलोमीटर लांबीची दाबनलिका टाकण्यात आली आहे. ही दाबनलिका जमिनीतून टाकण्यात आल्यामुळे ती खराब झाली आहे. त्यामुळे या दाबनलिकेला वारंवार गळती लागून नगरपालिकेचे मोठे नुकसान होते. म्हणून ही दाबनलिका बदलण्यासाठी शासनाकडे प्रयत्न चालू होते. राज्य शासनाने नगरोत्थान योजनेतून दाबनलिकेला २७ कोटी रुपये खर्चास परवानगी दिली आहे. मात्र, हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.
तसेच शहरातील बाह्यवळण मार्गासह विविध प्रमुख सोळा रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३२ कोटी रुपयांचा प्रकल्प शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यापैकी २५ कोटी रुपयास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू आहे. हे सुद्धा रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम शासनाच्या बांधकाम खात्याकडून करण्यात येणार आहे. अशाप्रकारे कृष्णा नळ योजना व रस्त्यांच्या डांबरीकरणाचे असे मिळून होणारे ५२ कोटी रुपयांचे काम शासनाकडून थेट केले जात आहे. मात्र, नगरपालिका हद्दीमध्ये होणारी कामे पालिकेमार्फत निविदा काढून करण्याचा प्रघात आहे. त्याला आता फाटा दिला जात आहे.
परिणामी नगरपालिकेतील लोकनियुक्त पदाधिकारी व नगरसेवकांना यामध्ये डावलले गेल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी)


इचलकरंजीतील अतिक्रमित ४४ धार्मिक स्थळे काढून टाकणार
इचलकरंजी : नगरपालिका हद्दीतील शासकीय व सार्वजनिक जागांवरील १२८ अनधिकृत धार्मिक स्थळांना इचलकरंजी नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असून, यापैकी ८४ धार्मिक स्थळे नियमितीकरणास पात्र, तर ४४ धार्मिक स्थळे काढून टाकण्यात येणार आहेत.
शहरातील विविध परिसरांमध्ये ही धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी नियमितीकरणास पात्र असलेल्या प्रमुख स्थळांमध्ये दत्त मंदिर (शिक्षक कॉलनी), शिवमंदिर (मलाबादे शाळा पश्चिमेस), भवानी मंदिर (नारायणनगर), इस्लामपुरा मस्जिद (बेलबाग), सोनपावली मारुती मंदिर (सरस्वती मार्केट), बराखा प्रार्थना मंदिर (नेहरूनगर झोपडपट्टी), चर्च (नेहरूनगर झोपडपट्टी), मस्जिद (रेयॉन पेट्रोल पंपामागे), काळा मारुती मंदिर (गोकुळ चौक रोड), दत्त मंदिर (यशवंत कॉलनी, भिडे कार्यालय), शिवमंदिर (कमला-नेहरू सोसायटी), भगवान जिव्हाजी मंदिर (जिव्हाजी बॅँकेजवळ), मस्जिद (इंदिरानगर), कैलास मंदिर (लिंगायत समाज स्मशानभूमी), मस्जिद (जाधव मळा), हनुमान मंदिर (आसरानगर), गणपती मंदिर (मोठे तळे), विठ्ठल मंदिर (गेस्ट हाऊससमोर), भुवनेश्वरी मंदिर (आदर्श मंगल कार्यालयाजवळ), दुर्गामाता मंदिर (सटाले गल्ली, मंगळवार पेठ), आदींचा समावेश आहे.
तसेच निष्कासनास पात्र असलेल्या प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये वेताळ मंदिर (वेताळ पेठ चौक), दुर्गामाता मंदिर (जुना चंदूर रोड), गणपती मंदिर (गणपती कट्टा, कोल्हापूर बेकरी रोड), दत्तमंदिर (दत्तनगर), हनुमान मंदिर (जुना सांगली नाका चौक), प्रार्थना हॉल (कुष्ठरोगी वसाहत), मस्जिद (म्हसोबा गल्ली नं. १, विक्रमनगर), हनुमान मंदिर (गुजरी पेठ),
गणपती मंदिर (डॉ.जोशी हॉस्पिटलसमोर), आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Government policy resentment: the verdict on the claim of people's representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.