कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर सुरू झालेल्या शासकीय कार्यालयात मार्चअखेरची कामे करण्यासाठी नागरिकांनी मंगळवारी एकाच दिवशी धाव घेतल्याने शहरातील सर्व महत्त्वाची कार्यालये ओसंडून वाहताना दिसत होती. प्रचंड गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सचाही पूर्णपणे फज्जा उडाल्याचेच सार्वत्रिक चित्र होते, नाही म्हणायला तोंडावर मास्क होते, एवढीच काय ती समाधानाची बाब. एकूणच मार्चअखेरच्या कामांच्या पूर्ततेसमोर कोरोनाची भीतीही पळून गेली.
मार्चअखेरचा आज बुधवारचा शेवटचा दिवस. शासकीय कार्यालयातील बहुतांशी कामांची पूर्तता या काळात होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते महावितरणच्या कार्यालयापर्यंत आणि जिल्हा परिषदेपासून ते आरटीओ, प्रशासकीय इमारतीतील मुद्रांक कार्यालयापर्यंत जिथे पाहावे तिकडे कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांचे जथ्ये दृष्टीस पडत होते. कार्यालये तुडुंब भरल्याने पोर्चमध्ये, मुख्य इमारतीच्या आवारात मिळेल त्या जागेवर, पायऱ्यावर नागरिक बसल्याचे चित्र सर्व शासकीय कार्यालयात दिसत होते.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करु नये, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत, पण कामांच्या पूर्ततेसमोर या सर्व सूचनांचे काहीच मोल राहिलेले नाही. मार्चअखेरपर्यंत कामे पूर्ण झाली नाहीत तर त्यांचा पुढील आर्थिक वर्षावर परिणाम होतो, आर्थिक दंडाचाही भुर्दंड बसतो, त्यामुळे कोरोनाची कितीही भीती मनात असलीतरी ती दूर सारत नागरिकांनी कामांच्या पूर्ततेला प्राधान्य दिले.
कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत पाय ठेवायला जागा नाही, इतकी गर्दी होती. तळमजल्यावरील मुद्रांक कार्यालयात जितकी माणसे होती, त्याच्या चारपटीने अधिक बाहेर पोर्चमध्ये पायऱ्यावर बसलेली, उभी असलेली माणसे दिसत होती. काहीनी मास्क लावला होता, तर काहीनी त्याचीही तसदी घेतली नव्हती. एकमेकांच्या जवळ बसू नये या नियमाचाही विसर पडल्यासारखेच चित्र होते. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी देखील नागरिकांच्या गराड्यातच होते. कार्यालयाच्या आतील आणि बाहेरील चित्र पाहिल्यावर कोराेना नावाची काही साथ आहे का याचाच विचार करावा लागत होता.
फोटो: ३००३२०२१-कोल-मार्च एन्ड
फोटो ओळ: कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत मार्चअखेरच्या कामासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने मंगळवारी मुद्रांक कार्यालयही असे गजबजले होते.
(छाया: आदित्य वेल्हाळ)