शासकीय जमिनींची राजरोस विक्री

By Admin | Updated: September 5, 2014 23:24 IST2014-09-05T21:48:59+5:302014-09-05T23:24:26+5:30

पैशाच्या हव्यासापोटी राजरोसपणे या जमिनीची धनदांडग्यांना विक्री

Government land sales | शासकीय जमिनींची राजरोस विक्री

शासकीय जमिनींची राजरोस विक्री

राजाराम कांबळे - मलकापूर -शासनाने शाहूवाडी तालुक्यातील अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांना मुलकीपड व नियमित सत्ता प्रकारच्या जमिनी कसण्यासाठी दिल्या असताना पैशाच्या हव्यासापोटी राजरोसपणे या जमिनीची धनदांडग्यांना विक्री केली जात आहे. यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच एजंटांची साखळी तालुक्यात सक्रिय आहे. शाहूवाडी तालुक्यात शासनाची १०६९४ हेक्टर मुलकीपड जमीन आहे. तालुक्याला खनिजे, औषधी वनस्पती, जंगलसंपत्ती व जमिनीची देणगी लाभली आहे. येथील ७५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत, तर इतरांना पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई व अन्य ठिकाणी जावे लागते. शासनाच्या नियमाप्रमाणे भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांना चरित्रार्थासाठी सरकारी हक्कातील जमिनी इतर हक्कांमध्ये अविभाज्य व नियमित सत्ता प्रकार असा शेरा देऊन कसण्यासाठी त्यांच्या नावावर केली आहे. ही जमीन कोणा व्यक्तीला खरेदी व विक्री करण्याचा अधिकार नाही. एखादी जमीन मालक व्यक्ती दुर्धर (असाध्य) रोगाने आजारी असेल तर पुणे आयुक्तांची परवानगी घेऊन त्याची विक्री केली जाते; मात्र या खरेदी व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशीदेखील केली जाते.तालुक्यात बॉक्साईटचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे, तर पवनचक्कीचे प्रकल्प उभारले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या जमिनीची खरेदी विक्री सुरू आहे. जमिनीचा व्यवहार तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात केला जातो. एजंटांकडून कायद्याच्या पळवाटेचा चुकीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. व जमीन विक्रीसाठी राजी केले जात आहे. बळिराजाला तुटपुंजी रक्कम हातावर ठेवून प्रसंगी धाकटपाशा दाखवून त्याला पिटाळले जाते. आपली फसवणूक झाली आहे, असे शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर वेळ निघून गेलेली असते. यामध्ये जमिनीची मध्यस्थी करणारे दलाल मालामाल होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत दलालाची संख्या वाढू लागली आहे. शासनाचे काम करणारे कांही तलाठी जमीन खरेदी-विक्री व्यवहारात आघाडीवर आहेत. जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी मुंबई-गोवा, पुणे कोलकाता, कर्नाटक, बेळगाव, कोकण, आदी भागांतून व्यापाऱ्यांनी या भागात आपला प्रतिनिधी म्हणून काही दलालांची नियुक्ती केली आहे. येळवण जुगाई, मांजरे, गावडी, अणुस्कुरा, गजापूर, कुंभवडे, शेबवणे, परिवणे, आदी गावांत मुलकीपड व सरकार हक्कातील जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री व ९९ वर्षांच्या कराराने जमिनी विकल्या आहेत.
शासनाने या दिलेल्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात जात असल्यामुळे भविष्यात येथील शेतकरी भूमिहीन होऊन त्यांना मजुरीशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, त्यामुळे अशा प्रकारांवर अंकुश गरजेचा आहे. तालुक्यातील अणुस्कुरा गावातील मुलकीपड जमीनविक्री केल्याप्रकरणी एका तलाठ्याची उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे, तर एका वाडीतील सरपंच तलाठी यांनी वनखात्याचा शेरा असलेली जमीन विक्री केली आहे. या प्रकरणाची फाईल सध्या शाहूवाडी पोलिसांत आहे; मात्र बदली आलेल्या अधिकाऱ्याने मोठा ‘ढपला’ पाडून प्रकरण दडपल्याची चर्चा या भागात आहे. मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यांनी खरेदी केल्या आहेत त्यांची शासनाने व जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधित शेतकरी, दलाल, तलाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

अणुस्कुरा गावातील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात एका तलाठ्याची चौकशी सुरू आहे. बेकायदेशीरपणे शासनाची जमीन विक्री करणाऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई करावी.
- काशीनाथ पाटील, शेतकरी, सरपंच, अणुस्कुरा

जमिनी खरेदी-विक्री करण्यात तलाठी, मंडल अधिकारी यांची संबंधित अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख
दत्ता पवार यांनी दिला.

Web Title: Government land sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.