शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील : सदाभाऊ खोत
By Admin | Updated: March 15, 2017 18:14 IST2017-03-15T18:14:55+5:302017-03-15T18:14:55+5:30
कोल्हापुरात डिजीधन मेळाव्याचे उद्घाटन

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील : सदाभाऊ खोत
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील असून, ती दिली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित डिजीधन मेळाव्याच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जमाफीवर शिवसेनेसह दोन्ही कॉँग्रेसकडून अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, याबाबत विचारणा केली असता मंत्री खोत म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील असून, ती दिली जाणार आहे; परंतु शेतकरी या कर्जाच्या दुष्टचक्रात पुन्हा सापडू नयेत या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली होती, परंतु त्यानंतर पुन्हा शेतकरीराजा कर्जात अडकला आहे. त्यामुळे नुसती कर्जमाफी करून चालणार नाही, तर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रात अडकण्याची वेळ येऊ नये याची काळजी घेऊन त्यांना सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रथम पायाभूत सुविधा व त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी हा देशाचा कणा असल्याने त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचेच असल्याने त्यांच्या हिताचे काम करत आहे.