पूरग्रस्तांना न्याय देण्यास शासन कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:22+5:302021-08-01T04:22:22+5:30
इचलकरंजी : पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आपल्याला न्याय देण्याची भूमिका राज्य ...

पूरग्रस्तांना न्याय देण्यास शासन कटिबद्ध
इचलकरंजी : पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आपल्याला न्याय देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. निश्चितपणे शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी धीर सोडू नये. संकटाशी मुकाबला करण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी नगरपालिकेच्या सभागृहातील बैठकीत दिला.
महापुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पाटील शनिवारी इचलकरंजीच्या दौऱ्यावर होते. दुपारी एक वाजता नदिवेस नाका परिसरातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथील छावणीतील पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काही महिलांना पुनर्वसनासंबंधी विचारले असता, आमचे योग्यरित्या पुनर्वसन होणार असेल तर आम्ही तयार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पालिकेतील बैठकीत, पुराचे पंचनामा करण्यासाठी आलेल्या अभिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कोणीही दबाव आणू नये. पूर्णपणे पारदर्शक काम केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तुम्ही काहीही काळजी करू नका, शासन जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करेल. यंदाच्या महापुरामुळे शहराचे मोठे नुकसान झाले आहे. काही तत्काळ व काही दीर्घकाळ उपाययोजना करण्याची गरज असून पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या अनेक वर्षांपासून नदीतील वाळू उपसा बंद असून खोली कमी झाली आहे. नदी क्षेत्रातील अतिक्रमण महापुरास कारणीभूत असल्याचे खासदार धैर्यशील माने म्हणाले. महापुरामुळे आवाडे सबस्टेशन बंद ठेवावे लागत असल्याने सबस्टेशनची पॉवर ट्रान्सफॉर्मरसह उंची वाढवावी. पूरग्रस्त भागातील विद्युत मीटर महावितरणने मोफत बदलून द्यावेत. १८ कोटी ३४ लाखाची सुवर्णजयंती नगरोस्थान योजना मार्गी लावावी, आदी मागण्या आमदार प्रकाश आवाडे यांनी केल्या. तसेच नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शहरातील पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. तर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी सहाय्यक अनुदान तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.
पालिकेने अहवाल सादर करावा
पूर परिस्थितीचे पंचनामे झाल्यानंतर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही सुरू करा. जागेची पाहणी करा, तसेच पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजनांची माहिती संकलित करून नगरपालिकेने त्याचा अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
३१ आयसीएच