सायझिंग उद्योगाच्या ‘व्हॅट’ रद्दसाठी शासन सकारात्मक
By Admin | Updated: October 19, 2015 23:55 IST2015-10-19T23:36:10+5:302015-10-19T23:55:56+5:30
लवकरच निर्णय : अर्थमंत्र्यांची ‘सायझिंग’च्या शिष्टमंडळाला ग्वाही

सायझिंग उद्योगाच्या ‘व्हॅट’ रद्दसाठी शासन सकारात्मक
इचलकरंजी : सायझिंग उद्योगाला लागू केलेला मूल्यवर्धित कर (व्हॅट) रद्द होण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक असून, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील सायझिंग असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.शासनाच्या विक्रीकर खात्याकडून सायझिंग उद्योगाला वर्क्स काँट्रॅक्ट टॅक्स लागू करण्याच्या नोटिसा सुमारे पंधरा वर्षांपूर्वी देण्यात आल्या होत्या. त्याबाबत तत्कालीन शासनाकडे येथील सायझिंग असोसिएशनने प्रयत्न केले होते. तेव्हाचे वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाने तो माफ झाला होता. मात्र, हा कर कायमस्वरूपी रद्द होण्याविषयी प्रयत्न असोसिएशनकडून करण्यात येत होते. त्यानंतर सन २०११-१२ मध्ये काही सायझिंग उद्योगांना त्यांनी व्हॅट आॅडिट करून घेतले नाही म्हणून दंड लावण्यात आला, तर काही सायझिंग उद्योगांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.
या करातून कायमस्वरूपी सुटका मिळावी म्हणून सायझिंग असोसिएशनच्यावतीने शासनाकडे वारंवार प्रयत्न केले जात होते. मात्र, त्याला यश आले नाही. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नाने सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या मंत्रालयातील दालनात सायझिंग असोसिएशनच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक झाली. यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार, अर्थ सचिव श्रीनिवास, विक्रीकर आयुक्त राजू जलोटा, आमदार हाळवणकर, सायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष जयंत मराठे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार
या बैठकीमध्ये सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी व्हॅट रद्द करण्याविषयी शासनाची भूमिका सकारात्मक आहे. मात्र, हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन तो रद्द करावा
लागेल. त्यासाठी अर्थमंत्री मुनगंटीवार व आमदार हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला.