गोपाळांचा जल्लोष : ‘नेताजी पालकर’ने फोडली तीन लाखांची दहीहंडी
By Admin | Updated: August 18, 2014 23:55 IST2014-08-18T23:50:45+5:302014-08-18T23:55:31+5:30
कोल्हापुरात हंडी फोडली रे...

गोपाळांचा जल्लोष : ‘नेताजी पालकर’ने फोडली तीन लाखांची दहीहंडी
गडहिंग्लजच्या नेताजी पालकर गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात सात थर रचत ३७ फूट उंचीवरील ‘युवाशक्ती’ची तीन लाखांची दहीहंडी फोडली. सलग दुसऱ्या वर्षी ही दहीहंडी फोडण्याचा मान या पथकाने मिळविला तर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची दहीहंडी गोडीविहीर, तर लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मित्रमंडळाची दहीहंडी नृसिंह गोविंदा पथकाने सहा थर रचून फोडली.यंदा प्रथमच कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली दहीहंडी शिरोळच्या गोडी विहार तालीम मंडळाने फोडली.
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ‘नेताजी पालकर’चा बाल गोविंदा आकाश मोहितेने काठीने दहीहंडीला फटका मारताच उपस्थित तरुणाईने नृत्याचा फेर धरत जोरदार जल्लोष केला. हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईचा सळसळता उत्साह, डॉल्बीवर धडाडणारी मराठी-हिंदी गाणी, श्वास रोखायला लावणारे चित्तथरारक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा जोश, अशा वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी फोडण्याचा थरार येथील दसरा चौकात तब्बल तीन तासांहून अधिक वेळ रंगला.
‘धनंजय महाडिक युवाशक्ती’च्या दहीहंडीचे यंदा सातवे वर्ष होते. या वर्षीच्या दहीहंडीत नेताजी पालकर, शिरोळमधील जय हनुमान, जय महाराष्ट्र, अजिंक्यतारा, कुटवाडचे नृसिंह तालीम संघ, हसूरचे बालगोपाल तरुण मंडळ, राशिवडे खुर्दचे रासलिंग या पथकांनी सहभाग घेतला. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तीपूजनाने दहीहंडीची सुरुवात झाली. यावेळी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व आमदार के. पी. पाटील, महापौर तृप्ती माळवी, माजी आमदार पी. एन. पाटील, बजरंग देसाई, अरुंधती महाडिक, आदी उपस्थित होते.
दरम्यान ताराबाई पार्कातील पितळी गणपती चौकात दरवर्षी ‘गोकुळ’च्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ‘गोडीविहीर’ने सहा थर रचल्यानंतर संजय गोधडे या गोविंदाने दहीहंडी फोडली. या मंडळास ५० हजारांचे बक्षीस ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील व रवींद्र आपटे यांच्या यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक उपस्थित होते.
दरम्यान, लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मित्रमंडळाची दहीहंडी फोडण्यासाठी रासलिंग (राशिवडे), अजिंक्यतारा, जय महाराष्ट्र व नृसिंह गोविंदा पथक (कुटवाड) आले होते. ‘नृसिंह’ने सहा थर रचल्यानंतर ही दहीहंडी पहिल्याच प्रयत्नात शिवाजी कोळी या गोविंदाने फोडली. यावेळी ‘जय महाराष्ट्र’ने केलेल्या प्रयत्नात सहाव्या थरावरून खाली पडल्याने एक गोविंदा किरकोळ जखमी झाला. यावेळी काहीसा गोंधळ उडाला. पाणी प्यायल्यावर तो शुद्धीवर आला.
भाऊसिंगजी रोड, गुजरी कॉर्नर येथे बांधलेली दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. शिरोळच्या गोडी विहार तालीम मंडळाने ही दहीहंडी फोडून स्मृतिचिन्हावर नाव कोरले. विजेत्या संघाला नगरसेवक सत्यजित कदम, ‘मनसे’ परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय करजगार, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, शिवाजी कंदले, म्हसोबा देवालय आझाद मंडळाचे अध्यक्ष संजय करजगार, उपाध्यक्ष विराज ओतारी, तानाजी पाटील, विनोद लांडगे, सचिन घोटणे, प्रकाश लांडगे, आदी उपस्थित होते.
राजकीय पक्षांच्या मंडळींची मांदियाळी
‘युवाशक्ती’च्या दहीहंडी सोहळ्यास आमदार राजेश क्षीरसागर, ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, रवींद्र आपटे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश कुऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक, चंद्रकांत बोंद्रे, रामराजे कुपेकर, सुहास लटोरे, नगरसेवक प्रकाश गवंडी, सत्यजित कदम, राजू लाटकर, उद्योगपती अरविंदकुमार रुहिया, राष्ट्रवादीचे करवीर तालुका अध्यक्ष मधुकर जांभळे, संजय सावंत, संगीता खाडे, विजयसिंह मोरे, राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, कादरभाई मलबारी, शंकर पाटील, दिनकर कांबळे, पी. डी. धुंदरे, रामभाऊ चव्हाण, माणिक पाटील-चुयेकर, आदी उपस्थित होते.
बालगोविंदांसाठी विशेष दक्षता
दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात बालगोविंदा जखमी होऊ नयेत, यासाठी संयोजकांनी विशेष दक्षता घेतली होती. बालगोविंदाला विशेष रोप लावण्यात येत होता. ही सुविधा हिलरायडर्स ग्रुपने पुरविली.
गुणवंत खेळाडूंचा गौरव
राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते गणेश माळी, ओंकार ओतारी, चंद्रकांत माळी आणि राही सरनोबत यांच्यातर्फे त्यांच्या नातेवाईकांना, तर ‘आर्यन मॅन’ ठरलेल्या आकाश कोरगांवकरला ११ हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.